हलव्याच्या आकर्षक दागिन्यांनी सजली बाजारपेठ; फॅशननुसार बदलतोय ट्रेण्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:20 AM2020-01-13T00:20:55+5:302020-01-13T00:21:16+5:30

कारागीर वाढल्याने दर झाले कमी, जावयासाठी काटेरी हलव्यात मोबाइल सेट

A market adorned with eye-catching jewelry; Trends are changing according to fashion | हलव्याच्या आकर्षक दागिन्यांनी सजली बाजारपेठ; फॅशननुसार बदलतोय ट्रेण्ड

हलव्याच्या आकर्षक दागिन्यांनी सजली बाजारपेठ; फॅशननुसार बदलतोय ट्रेण्ड

Next

ठाणे : नववर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या सणाच्या दिवशी घरात आलेल्या सुनेला, जावयाला, नवजात बालकाला हलव्याचे दागिने घातले जातात. त्यांचे स्वागत केले जाते. यानिमित्ताने ठाण्याच्या बाजारात आकर्षक कागदी फुलांनी सजवलेले काटेरी हलव्याचे दागिने आले आहेत. नववधूसाठी आलेला गौरी सेट, शाही हार, मिनी सेट महिलावर्गाच्या पसंतीस पडत आहे, तर जावयासाठी यंदा काटेरी हलव्यात मोबाइल सेट आला आहे.

या दागिन्यांचा ट्रेण्ड बदलत असून दागिन्यांच्या विविध प्रकारांनी यात जागा घेतली आहे. पूर्वी फक्त मोजकेच दागिने यात असत. परंतु, जसजशी नवीन फॅशन येऊ घालत आहे, तसतसे यातही नावीन्यपूर्ण दागिने पाहायला मिळत आहेत. शाही हार ज्याची किंमत ३५० रुपये आहे, तसेच गौरी सेट आहे. ज्यात बांगड्या, मंगळसूत्र, झुमके, अंगठी, नथ या मोजक्याच दागिन्यांचा समावेश आहे. हा सेट ३०० रुपयांना मिळत आहे. ज्यांना जास्त दागिने घालायला आवडत नाही, त्या नवविवाहित महिला या सेटला पसंती देत असल्याचे विक्रेत्या दर्शना तंटक यांनी सांगितले. मेखला ३५० रुपयांना आहे. नेकलेस, बिंदी, झुमके, कानवेल, नथ, बाजूबंद, बांगड्या, मंगळसूत्र, अंगठी या दागिन्यांचा मिनी सेट ५०० रुपयांना मिळत आहे. नेकलेस, बिंदी, झुमके, कानवेल, नथ, बाजूबंद, बांगड्या, मंगळसूत्र, अंगठी, कमरपट्टा, मुकुट, चिंचपेटी या दागिन्यांचा पूर्ण सेट ९०० रुपयांना उपलब्ध आहे. ज्यांचे पॅटर्न वेगळे, त्यांचे दर ७०० ते ९०० रुपयांदरम्यान आहेत. साडीची पिन, बिंदिया, गजरादेखील काटेरी हलव्यात पाहायला मिळत आहे. लहान मुलींसाठी राधा सेट उपलब्ध आहे. यात दोन बाजूबंद, मुकुट, कानांतले, अंगठी, हार, गुलाबाचे फुल, तर दुसऱ्या सेटमध्ये हेअर बॅण्ड, पायल, हार, बाजूबंद, बांगडी, कमरपट्टा हे दागिने आहेत. याचे दर २०० ते २५० रुपयांच्या आसपास आहे. लहान मुलांसाठी कृष्णा सेट उपलब्ध असून यात मुकुट, मोरपीस, मनगट्या, बाजूबंद, हार, बासरी असे पॅटर्न असून याचे दर १०० ते २०० रुपये आहे.

यंदा काटेरी हलव्याचे दागिने बनविणारे कारागीर वाढल्याने दर कमी झाले असल्याची माहिती दर्शना यांनी दिली. जावयासाठी हार, नारळ आले असून मोबाइलचा एक आगळावेगळा सेट पाहायला मिळत आहे. या सेटमध्ये मोबाइलबरोबर अंगठी, पेन, घड्याळाचा समावेश आहे. याचे दर २५० रुपये आहे.

Web Title: A market adorned with eye-catching jewelry; Trends are changing according to fashion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.