घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली
By admin | Published: October 1, 2016 03:07 AM2016-10-01T03:07:34+5:302016-10-01T03:07:34+5:30
नवरात्रोत्सव शनिवारपासून असल्याने घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी बाजार गर्दीने फुलून गेला होता. देवीच्या पूजाविधीसाठी लागणारे साहित्य, फुले, फळे, प्रसाद यांच्या
ठाणे : नवरात्रोत्सव शनिवारपासून असल्याने घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी बाजार गर्दीने फुलून गेला होता. देवीच्या पूजाविधीसाठी लागणारे साहित्य, फुले, फळे, प्रसाद यांच्या खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. मंडळांचे मंडप आणि परिसरातही देवीच्या आगमनाची तयारी सुरू होती. त्यामुळे नवरात्रोत्सवानिमित्ताने लगबग आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
ठाण्यातील मुख्य बाजारपेठ, गोखले रोड, गावदेवी मार्केट परिसरात नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदीविक्री सुरू होती. वाढत्या महागाईचा परिणाम प्रत्येक वस्तूच्या किमतीवर झालेला पाहायला मिळाला. काळ्या रंगाचे साधे किंवा तांब्याचे घट, त्याचबरोबर कलाकुसरीने सजवलेल्या विविध रंगांचे घट खरेदी केले जात होते. देवीची आरास करण्यासाठी लागणारी झेंडू, शेवंतीची फुले, वेण्या, हार खरेदीसाठी फुल बाजारात गर्दी होती. फळांच्या किमतीतही वाढ झाली असली तरी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड होती.
गरबा, रास दांडियाच्या दृष्टीने उरलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी तरुणींची गर्दी दिसत होती. त्यातही पावसाने उसंत घेतल्याने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांनी मनसोक्त खरेदी केली. दुसरीकडे सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये देखाव्यांवर आखेरचा हात फिरवला जात होता.
देवीच्या दीड हजार मूर्तींचे आज आगमन
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दीड हजार सार्वजनिक व खाजगी देवीच्या मूर्तींचे आगमन होणार आहे. तर एक हजार घट व कलश तसेच ५५७ प्रतिमांची अशी एकूण दोन हजार ६९९ मूर्ती, घट आणि प्रतिमांची पूजाअर्चा शनिवारपासून १० दिवस केली जाणार आहे. विशेष म्हणजे या उत्सवादरम्यान कोणत्याही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. त्यानुसार, चोख पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातील या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवात तरु णाई मोठ्या प्रमाणात गरबा रास खेळण्यास बाहेर पडत असल्याने साध्या वेशातही पोलीस तैनात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयुक्तालयात ४ ठिकाणी रावणदहन तर दोन ठिकाणी रामलीला होईल. भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या तीन परिमंडळांत हे कार्यक्रम होतील.
यंदा १० दिवस उत्सव
यंदा नवरात्रोत्सव १० दिवस साजरा होणार असून त्याचे १० रंग जाहीर झाले आहेत. उत्सवाला शनिवारपासून सुरुवात होणार असली, तरी आॅफिस, कॉलेज सोमवारपासून सुरू होणार असल्याने तेव्हापासूनच रंगांचे सेलिब्रेशन पाहायला मिळेल.
यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रतिपदा ही तिथी दोन दिवस असल्याने उत्सव १० दिवस साजरा होणार आहे. त्याचे रंग जाहीर होताच खरेदीला सुरुवात झाली.
१० दिवसांचे दहा रंग पाहून त्यात्या रंगांचे ड्रेस, कुर्ते, साड्या आपल्याकडे आहेत की नाही, याची तपासणी अनेकांनी केली.