उल्हासनगरातील मार्केट परिसर केला सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:10+5:302021-04-16T04:41:10+5:30
उल्हासनगर : संचारबंदीची पोलिसांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. विनाकारण फिरणारे नागरिक, वाहनचालकांची झाडाझडती पोलीस घेत असून प्रसिद्ध जपानी, ...
उल्हासनगर : संचारबंदीची पोलिसांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. विनाकारण फिरणारे नागरिक, वाहनचालकांची झाडाझडती पोलीस घेत असून प्रसिद्ध जपानी, गजानन कापड मार्केट परिसरातील नेहरू व शिरू चौक सील केला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. उपायुक्त मदन सोंडे यांच्या मुलाला संसर्ग झाल्याने, ते होम क्वारंटाइन आहेत. महापालिका आयुक्तांचा प्रभारी पदभार भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दिला असला तरी सर्व महापालिका कामकाजाचा भार उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्यावर पडला आहे. उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड रेल्वेस्थानकाबाहेर नागरिकांची वर्दळ नेहमीपेक्षा कमी असल्याने रिक्षाची संख्याही घटली होती. तीच परिस्थिती शहरातील मुख्य चौक, बाजारपेठांमध्ये होती. भाजीपाला, किराणा दुकान व भाजीपाला मंडई आदी ठिकाणी नागरिकांची वर्दळ असली तरी नागरिक फिजिकल डिस्टन्सिंग पाळत होते. मात्र, काही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांना पोलिसांनी आपल्या पद्धतीने समजावून घरी पाठविले.
शहरातील प्रसिद्ध जीन्स मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, फर्निचर मार्केट, बॅग मार्केट, गाऊन मार्केट, जपानी व गजानन कपडा मार्केट, सोन्यासाठी प्रसिद्ध असलेली सोनार गल्ली मार्केटमध्ये शुकशुकाट होता. मार्केटकडे जाणारे रस्ते पोलिसांनी सील करून वाहतुकीस मनाई केली. गोल मैदान परिसर, शिवाजी चौक, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड रेल्वे स्टेशन परिसर, खेमानीसह अन्य औद्योगिक परिसरात काही प्रमाणात नागरिकांची ये-जा होती. मात्र, शहरातील इतर ठिकाणी नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.