बाजारपेठांत झाली `फूल्ल टू` गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:59+5:302021-06-02T04:29:59+5:30

ठाणे, कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप रोखण्याकरिता गेली सुमारे दोन महिने लागू केलेला लॉकडाऊन शिथिल होताच मंगळवारी जिल्ह्यातील ...

The market was full of crowds | बाजारपेठांत झाली `फूल्ल टू` गर्दी

बाजारपेठांत झाली `फूल्ल टू` गर्दी

Next

ठाणे, कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप रोखण्याकरिता गेली सुमारे दोन महिने लागू केलेला लॉकडाऊन शिथिल होताच मंगळवारी जिल्ह्यातील जवळपास सर्व शहरांमधील सर्व दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत खुली होताच रस्ते, बाजारपेठांमधील माणसांची, वाहनांची गर्दी बऱ्यापैकी वाढली. पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतील किंवा उठाबशा काढाव्या लागतील या भीतीने घराबाहेर पडण्यास कचरणारे हवशेगवशे पुन्हा बिनदिक्कत रस्त्यावर आले. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेची भीती वाढली असून जे दुकानदार सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आदी नियम पाळणार नाहीत व निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ दुकाने सुरु ठेवतील त्यांची दुकाने बेमुदत सील करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या गर्दीत मंगळवारी लक्षणीय वाढ झाल्याने टोलनाक्यापाशी सकाळी व सायंकाळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्यांच्या नशिबी वाहतूककोंडीचा फेरा मंगळवारपासून सुरू झाला. ठाणे शहरातील राम मारुती रोड, गोखले रोड, जांभळी नाका अशा वेगवेगळ्या ठिकाणी बाजारपेठांमधील गर्दी वाढली होती. कपडे, बूट-चपला व मुख्यत्वे पावसाळी खरेदीकरिता गर्दी झाली होती. सोनारांच्या पेढ्या उघडल्या असल्या तरी तेथे तुरळक गर्दी दिसली. बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील दुकाने सकाळी ७ ते २ वाजताच्या दरम्यान सुरु करण्यास परवानगी दिली गेल्याने मंगळवारी बाजारात खरेदीसाठी एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. रुग्णसंख्या कमी होत असताना बाजारात दररोज अशी गर्दी उसळणार असेल तर नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचे आव्हान महापालिका व पोलीस यंत्रणेवर राहणार आहे.

अत्यावश्यक सेवेच्या दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात आली. तर अनावश्यक सेवेतील दुकानेही सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली होती. शिवाजी चौक, महमंद अली चौक, स्टेशन परिसरात खरेदीसाठी गर्दी उसळली होती. बाजारात चपला, रेनकोट, घर दुरुस्तीचे साहित्य, ताडपत्री खरेदीसाठी लोक दुकानात मोठ्या संख्येने दिसून आले. महापालिका हद्दीत दुसरी लाट फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झाली. रुग्णसंख्या रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ११ मार्च पासून कडक निर्बंध लागू केले. दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहून राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदीसह लॉकडाऊन लागू झाला. १५ जूनपर्यंत निर्बंध राहणार, असे सरकारने जाहीर केले. मात्र ज्या महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या कमी झाली आहे. तेथे शिथिलता दिली गेली. दुकानांची वेळ वाढवल्यामुळे हवशेगवशे विनाकारण पुन्हा रस्त्यावर दुचाकीवरुन हुंदडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांना वेसण घालणे गरजेचे आहे.

कोन गावाच्या ठिकाणी मंगळवारी सकाळी सुकी मासळी खरेदी करण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती. दुर्गाडी पुलाच्या दोन लेन सोमवारी सुरु झाल्या असल्या तरी जुन्या पुलावरुन कोनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

......

जे दुकानदार दिलेल्या वेळेचे आणि कोरोना नियमावलीचे बंधन पाळणार नाही त्यांच्या विरोधात केवळ दंडात्मक कारवाई केली जाणार नाही तर त्यांची दुकाने कोरोना काळ संपुष्टात येईपर्यंत कायमस्वरुपी सील करण्यात येतील.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, केडीएमसी

------------------------

वाचली

Web Title: The market was full of crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.