बाजारपेठ सजली अन झगमगली!, खरेदीचा उदंड उत्साह : भेटवस्तू-कंदिलांची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:39 AM2017-10-16T06:39:34+5:302017-10-16T06:40:27+5:30
वसुबारस सुरू झाली आणि दिवाळीने आपल्या उत्साहाची, आनंदाची झालर साºया वातावरणावर पसरली. नोटाबंदी, महागाईमुळे सणांवर परिणाम होणार, असे भाकीत केले जात
- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
वसुबारस सुरू झाली आणि दिवाळीने आपल्या उत्साहाची, आनंदाची झालर साºया वातावरणावर पसरली. नोटाबंदी, महागाईमुळे सणांवर परिणाम होणार, असे भाकीत केले जात होते. पण ऋण काढून सण साजरे करण्याची आपली परंपरा पाहता सहामाही परीक्षा संपल्यावर आणि पगार, बोनस हाती पडल्यावर अपेक्षेप्रमाणे बाजारपेठांत गर्दी झाली. चमचमत्या दिव्यांची रोषणाई, आॅफर्सची लयलूट, नाविन्यपूर्ण वस्तुची भाऊगर्दी यामुळे बाजारपेठा सज्ज आहेत.
यंदा दिवाळीच्या खरेदीला पाऊस सोबत करत असल्याने खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. संध्याकाळी पडणारा पाऊस पाहता खरेदीसाठी दुपारी गर्दी होते आहे. पावसामुळे ग्राहकांच्या आनंदावर विरजण आणि व्यापाºयांच्या चेहºयावर चिंता दिसते आहे.
उटणे, आकाशकंदील, रांगोळ्या, कपडे, पणत्या यांनी तर बाजार अधिक फुलला. वेळ मिळेल तसे लोक खरेदीसाठी बाहेर पडू लागले. हळूहळू सुरू झालेली खरेदी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. गर्दीने बाजारातील रस्ते ओसंडून वाहात आहेत. खरेदीत काही राहिले तर नाही ना, याचीही शहानिशा लोक करत आहेत. वारंवार साहित्याची यादी तपासली जात आहे. चैतन्याचे वातावरण बाजारात पाहायला मिळत आहे. खरेदीचा उत्साह प्रत्येकाच्या चेहºयावर दिसतो आहे. या सणाच्या निमित्ताने चांगला रोजगार मिळत असल्याने रस्त्यारस्त्यांवर छोटेछोटे विक्रेतेही मिळेल तशी जागा अडवून बसले आहेत.