ठाण्यात शुक्रवारीही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:19+5:302021-04-10T04:39:19+5:30
ठाणे : शनिवार-रविवारच्या विकेण्ड लॉकडाऊनमध्ये ठाणे महापालिका प्रशासनाने काही मुभा दिल्या असल्या तरी मात्र शुक्रवारी ठाण्यात अनेक भागात शुकशुकाट ...
ठाणे : शनिवार-रविवारच्या विकेण्ड लॉकडाऊनमध्ये ठाणे महापालिका प्रशासनाने काही मुभा दिल्या असल्या तरी मात्र शुक्रवारी ठाण्यात अनेक भागात शुकशुकाट दिसून आला. केवळ अत्यावश्यक सेवेचीच दुकाने सुरू होती. तर बाजारपेठ आणि इतर दुकानेदेखील शुक्रवारी बंद होती. याशिवाय शहरातील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळही कमी झाल्याचे दिसत होते.
विकेन्ड लॉकडाऊनबाबत महापालिकेने पत्र काढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या विद्यार्थ्यांना/ परीक्षार्थीना, स्पर्धा परीक्षांसह अन्य परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे, अशा परीक्षार्थींना या कालावधीत आवश्यक प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच संबंधित परीक्षार्थी यांच्याकडील हॉल तिकीट हा प्रवासाकरीताचा वैध आवश्यक पुरावा म्हणून मानला जाईल. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षार्थीला स्वत: बरोबर एक पालक / सहकारी प्रवासादरम्यान ठेवता येणार आहे. ऑनलाईन डिलिव्हरी देणाऱ्या अन्नपुरवठा करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेतील अन्न पुरवठादारक (ई-कॉमर्स उदा. झोमॅटो, स्विगी) आदीं साठी आठवड्यातील सर्व दिवस २४ तास सेवा पुरविण्याची मुभा असेल. मात्र, नागरिकांना हॉटेल मधून स्वत: जाऊन पार्सल नेण्याची मुभा असणार नाही, परंतु, हॉटेलमार्फत घरपोच सेवा पुरवण्याची हॉटेल आस्थापनांना मुभा असेल.
त्यानुसार शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार शुक्रवारी बंद असल्याचे दिसून आले. स्टेशन परिसर, जांभळी नाका या भागातील देखील भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांची दुकाने सुरू होती. इतर व्यवहार मात्र बंद असल्याचे दिसून आले. शहरातील रस्त्यांवरील वाहतूकही मंदावली असल्याचे चित्र होते. नागरिकांनी देखील केवळ लसीकरणासाठी बाहेर पडणे पसंत केले. मात्र इतर नागरिकांनी घरीच राहून सहकार्य केले.
ठाणे परिवहन सेवेच्या बस देखील कमी प्रमाणात रस्त्यावर धावताना दिसत होत्या. केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाच बसमध्ये प्रवासाची परवानगी होती. इतर प्रवाशांना प्रवासाची मुभा नव्हती. परंतु, शहरातील काही गल्लीबोळातील दुकाने मात्र काही प्रमाणात सुरू असल्याचे चित्र दिसत होते.