लग्नातील दारू, मांसाहार, मानपान बंद होणार
By admin | Published: March 12, 2016 01:59 AM2016-03-12T01:59:43+5:302016-03-12T01:59:43+5:30
मटण, दारू, मानपान नाही तर लग्नाला मजा नाही, अशीच प्रथा पडलेली असताना मात्र आदिवासी समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शहापूर तालुक्यातील मुसई पठारावर
भातसानगर : मटण, दारू, मानपान नाही तर लग्नाला मजा नाही, अशीच प्रथा पडलेली असताना मात्र आदिवासी समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन शहापूर तालुक्यातील मुसई पठारावर लग्नासाठीचा हा खर्च न करण्याचा निर्धार केला आहे.
ज्याच्या लग्नात उपरोक्त बडदास्त अधिक ते लग्न जोरात. ज्याचाकडे हा खर्च नाही ते लग्न साधेच, अशी प्रथाच जणू सगळीकडे पडलेली असतानाच शहापूर तालुक्यातील मुसई पठारावरील मुसईपाडा, शिदपाडा, खडूचीवाडी, चिंचपाडा, जांभूळपाडा, घरटन, कृष्णाचीवाडी, काटीचीवाडी, आंब्याचीवाडी, खरली आदी पाड्यांतील ४०० हून अधिक नागरिकांनी आदिवासी जिल्हा समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद्माकर केवारी, सह्याद्री आदिवासी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष जानू हिरवे, मालू वाख, रवींद्र हिरवे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन यापुढे लग्नकार्यात होणारा हा खर्च टाळण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या सभेत घेतला, त्याला समाजबांधवांनी पाठिंबा दिला. (वार्ताहर)