विवाहयोग जुळला, पण ‘कचऱ्याचा राहू’ कुंडलीत कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:51 AM2019-01-08T02:51:24+5:302019-01-08T02:52:11+5:30

शहराच्या पश्चिम भागातील आधारवाडी भागातील एका तरुणाचा विवाहयोग डम्पिंग ग्राउंडच्या त्रासामुळे उशिरा का होईना, अखेर जुळून आला आहे.

Marriage matches, but 'waste to remain' in horoscope! | विवाहयोग जुळला, पण ‘कचऱ्याचा राहू’ कुंडलीत कायम!

विवाहयोग जुळला, पण ‘कचऱ्याचा राहू’ कुंडलीत कायम!

Next

मुरलीधर भवार 

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील आधारवाडी भागातील एका तरुणाचा विवाहयोग डम्पिंग ग्राउंडच्या त्रासामुळे उशिरा का होईना, अखेर जुळून आला आहे. येथील डम्पिंग ग्राउंडची समस्या मात्र कायम आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे अमोल जोशीचा विवाह होत नसल्याचा सामाजिक मुद्दा तीन वर्षांपूर्वी उघड झाला होता.

आधारवाडी डम्पिंगच्या ठिकाणी कचºयाचा २५ मीटर उंच डोंगर झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होतो. अधूनमधून कचºयाला आग लागल्याने नागरिकांच्या नाकातोंडात धूर जाऊन त्यांचा श्वास गुदमरतो. डम्पिंगला आगीच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ३१ मे २०१६ रोजी महापालिकेवर धडक दिली होती. या शिष्टमंडळात नीळकंठधारा इमारतीत राहणारा अमोल जोशी हा तरुणदेखील होता. डम्पिंगच्या त्रासामुळे आपल्याला कुणी मुलगी देत नाही. त्यामुळे लग्न जमत नसल्याचा आरोप त्याने त्यावेळी केला होता. त्यामुळे डम्पिंग हा केवळ आरोग्याचा नव्हे, तर तो एक सामाजिक प्रश्नही असल्याचे उघड झाले. नीळकंठधारातील महिलांनी अमोलच्या उपस्थितीत तत्कालीन महापौर राजेंद्र देवळेकर यांना निवेदन दिले होते. त्यावेळी देवळेकर यांनी एका वर्षात डम्पिंग हटवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत झालेली नाही. समस्या न सुटल्याने अमोलचे लग्न जमण्यास विलंबच झाला. अखेर, अडीच वर्षांनंतर अमोलचे लग्न जमले आहे. दरम्यानच्या काळात त्याने काही मुली पाहिल्या. शेवटी, त्याला अंबरनाथच्या मुलीने पसंती दिली आहे. त्याने सोमवारी माजी महापौर देवळेकर यांची भेट घेऊन त्यांना लग्नाची पत्रिका दिली आहे. अमोलचे लग्न जमले असले, तरी डम्पिंगची समस्या सुटलेली नाही. आपल्यासारखी गत अन्य तरुणांची होऊ नये, अशी अपेक्षा अमोलने व्यक्त केली. तो पौरोहित्य करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

नीळकंठधारातील नागरिकांनी २0१५ मध्ये महापालिकेवर धडक दिली, त्यावेळी डम्पिंग बंद करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल, असे वक्तव्य आयुक्त ई. रवींद्रन यांनी केले होते. त्यानंतर, आयुक्त पी. वेलारासू यांची नियुक्ती झाली. आताचे आयुक्त गोविंद बोडके यांचेही स्वागत डम्पिंगच्या प्रश्नावरूनच झाले होते. तेव्हा त्यांनीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते.
 

Web Title: Marriage matches, but 'waste to remain' in horoscope!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न