अनाथ मुलीचा धूमधडाक्यात विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:28 AM2019-04-09T00:28:09+5:302019-04-09T00:28:20+5:30
कचराकुंडीत सापडली होती मुलगी : मुरबाडमधील गोपालकृष्ण आश्रमाचा उपक्रम
मुरबाड : मुरबाड शहरात काही वर्षांपूर्वी कचराकुंडीत सापडलेल्या एका मुलीला नाव देण्याबरोबरच तिचे योग्य ते संगोपन करून तिला चांगल्याप्रकारे शिक्षण देऊन रविवारी तिचा धूमधडाक्यात विवाह सोहळादेखील संपन्न झाला.
नुकत्याच जन्मलेल्या एका मुलीला काही वर्षांपूर्वी मुरबाड शहरातील साईबाबा मंदिराच्या परिसरात कुणीतरी कचऱ्यामध्ये टाकून दिले होते. पुणेकरबाबांना हे समजताच त्यांनी तातडीने तिला डॉक्टरकडे नेत औषधोपचार केले. आश्रमात आणून तिचा योग्य प्रकारे सांभाळ करून तिला उत्तम शिक्षण दिले. याच ‘अंकिता’चा विवाह रविवारी तालुक्यातील माजगाव येथील कमलाकर शिरोसे या मुलाशी थाटामाटात झाला. यावेळी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मालवाडी बोटा येथील महानुभाव आश्रमाचे महंत अंकुळणेकरबाबा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी तसेच अनेक उद्योगपती, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील शेकडो ग्रामस्थ या सोहळ्यात उपस्थित होते.
मुरबाडजवळील टेमगाव येथे महानुभाव पंथाचे संदीपमुनी पुणेकरबाबा यांचा गोपाळकृष्ण आश्रम आहे. येथील श्रीकृष्ण मंदिर हे जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे. या आश्रमात ३० मुलेमुली राहतात. कोणतीही शासकीय मदत न घेता पुणेकरबाबा या सर्व मुलांचे चांगले संगोपन तसेच शिक्षणाचा खर्च करत आहेत.