माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 05:17 AM2019-01-11T05:17:03+5:302019-01-11T05:17:07+5:30
कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : सासरच्या मंडळींनी घरातून दिले हाकलून
ठाणे : माहेरून पैसे आणले तरच घरात घेतले जाईल, असे सुनावून रीना जोशी या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रीना यांचा २००९ मध्ये प्रेमविवाह झाला होता. परंतु, व्यसनाधीन पतीमुळे त्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. त्यावेळी मानसिक आधार देणाऱ्या प्रशांत जोशी यांनीच त्यांना लग्नाची मागणी घातली. त्यानुसार, २३ जुलै २०१८ रोजी त्यांचा चेंबूर येथे विवाह झाला. या लग्नासाठी प्रशांतच्या आईवडिलांना एक लाख १० हजारांचा खर्चही रीना यांच्या वडिलांनी दिला. याशिवाय, सोन्याचे दागिनेही दिले.
लग्नानंतर हे दाम्पत्य डोंंबिवलीच्या मानपाडा भागात सासू कमल (५७), सासरे रमेश (६५) यांच्यासह एकत्र वास्तव्याला होते. तू खूप वेळा नकार दिलास, केवळ जिद्द पूर्ण करण्यासाठी लग्न केले, असे पतीने नंतर बजावले. तर, सासूसासºयांनी तुझे पहिले लग्न झाले आहे. आमच्या मुलाला फसवून त्याच्या जीवनाची वाट लावलीस, असे आरोप करून तिची छळवणूक सुरू केली. लग्नात मानपानही केलेला नाहीस. तुझा पहिला घटस्फोट झालेला आहे. घरात राहायचे असेल तर पैसे आणून द्यावे लागतील, असे म्हणून सासरच्यांनी वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करून तसेच घरातून हाकलून देऊन मानसिक छळ केला. या सर्व छळाला कंटाळून रीना यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला.