फ्लॅटसह कारसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:50+5:302021-07-08T04:26:50+5:30
ठाणे : फ्लॅट आणि नवीन कारच्या खरेदीसाठी पतीकडून झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून मेघा डावळे (३२, रा. कोलशेत ...
ठाणे : फ्लॅट आणि नवीन कारच्या खरेदीसाठी पतीकडून झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून मेघा डावळे (३२, रा. कोलशेत रोड, ठाणे) या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पती इंद्रजित (३५) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कोलेशेत रोड येथे राहणाऱ्या इंद्रजित आणि मेघा यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर २३ जुलै २०१७ ते २७ जून २०२१ या कालावधीमध्ये इंद्रजित याने दारूच्या नशेमध्ये पत्नी मेघा हिला मारहाण केली. तसेच त्यांनी घेतलेल्या फ्लॅटसाठी आणि नवीन कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादाही तिच्याकडे लावला. यातूनच तिचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केला. नेहमीच्याच जाचाला कंटाळून तिने अखेर २७ जून रोजी कोलशेत येथील घरातील बेडरुममध्ये छताच्या सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार पती इंद्रजित याच्या निदर्शनास आल्याने त्याने तिला तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान १ जुलै २०२१ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. आपल्या बहिणीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विशाल घोगरे (३१, रा. उफळा, उस्मानाबाद) या भावाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात इंद्रजितविरुद्ध ५ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन इंद्रजित याला ५ जुलै रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात कलम ३०४ (ब), ४९८- अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मोसमकर हे अधिक तपास करीत आहेत.