रक्षाबंधनाला माहेरी पाठवले नसल्याने विवाहितेची १ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या
By जितेंद्र कालेकर | Published: September 1, 2023 09:32 PM2023-09-01T21:32:29+5:302023-09-01T21:35:03+5:30
पती, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा : प्रेमविवाहानंतरही सुरू होता पैशाकरिता छळ
ठाणे : सातारा येथे बहिणीच्या घरी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी जाण्यास पती महेश याने नकार दिल्याने प्रियांका मोहिते (२६) या विवाहितेने ध्रुवी या एक वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पती, सासू आणि नणंद या तिघांविरुद्ध भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
प्रियांका आणि महेश या दाम्पत्याचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. प्रियांका ही नात्यातीलच असल्याने दोन्ही कुटुंबांची त्यांच्या विवाहाला संमती होती. त्यांना ध्रुवी ही एक वर्षाची मुलगी होती. पतीला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमीच तिच्याशी शिवीगाळ करीत भांडण करायचा. त्यात भर तिची सासू आणि नणंद याही टोमणे मारून तिचा छळ करीत होत्या. काही दिवसांपूर्वी नातेवाइकांनी पुढाकार घेत त्यांच्यातील वाद मिटवला होता; परंतु तरीही पतीकडून तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी, तसेच छळ सुरू होता. ३१ ऑगस्ट रोजी तिला सातारा येथे बहिणीला भेटण्यासाठी पतीने पाठविले नाही. यातूनच पुन्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तिने कासारवडवलीतील जॉय स्क्वेअर या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मुलगी ध्रुवी हिच्यासह शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उडी घेतली. यात दोघींचाही मृत्यू झाला. प्रियांकाचा भाऊ चेतन पाटील ( रा. पुणे ) याने दिलेल्या तक्रारीवरुन पती महेश मोहिते, सासू विठाबाई मोहिते आणि नणंद मीनाक्षी मोहिते या तिघांविरुद्ध ४९८, ३०६ कलमांन्वये गुन्हा दाखल झाला असून यात पती महेश याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी सांगितले.