‘त्या’ जवानांना शहीद दर्जा; राज्य सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 02:05 AM2019-08-07T02:05:46+5:302019-08-07T02:06:04+5:30

मुलांचा शिक्षण खर्च, मोफत घर मिळणार

The martyrdom status of 'those' soldiers | ‘त्या’ जवानांना शहीद दर्जा; राज्य सरकारचा निर्णय

‘त्या’ जवानांना शहीद दर्जा; राज्य सरकारचा निर्णय

Next

कल्याण : केडीएमसीच्या अग्निशमन दलातील अनंत शेलार, प्रमोद वाघचौडे आणि जगन आमले या जवानांना नोव्हेंबर २०१८ मध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आले होते. या जवानांना शहीद दर्जा द्या, अशी मागणी भारतीय कामगार सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच केडीएमसीच्या महासभेतही यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला होता. अखेर या तीन जवानांना शहीद दर्जा राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे विविध सवलती व फायदे त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासह मोफत घरही मिळणार आहे. तसेच या जवानांच्या वारसांना केडीएमसीच्या सेवेत घेण्यात आले आहे.

कल्याण पूर्व येथील चक्कीनाका येथे १ नोव्हेंबर २०१८ ला विहिरीत पडलेल्या तिघांना वाचवताना फायरमन शेलार आणि वाघचौडे यांचा मृत्यू झाला होता. तर २९ नोव्हेंबरला कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क येथे दुकानांना लागलेली आग विझविताना लिडींग फायरमन आमले यांना मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वीरमरण आलेल्या या जवानांच्या वारसांना नोकरी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. राज्यातील विविध महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील अग्निशमन दलातील जवानांचा कर्तव्यावर बचावकार्य करताना मृत्यू झाला तर त्याला शहीद दर्जा द्यावा, अशी मागणीही भारतीय कामगार सेना या युनियनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

त्याचबरोबर घडलेल्या दोन दुर्घटनांकडे लक्ष वेधताना मृत जवानांच्या वारसदारांना सवलती अणि फायदे महापालिकेकडून मिळण्याबाबतचा नियम वा लिखित आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेसह राज्यातील महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमधील अग्निशमन दलाकडे नसल्याचा मुद्दाही पत्रात मांडण्यात आला होता. त्यामुळे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या जवानांना शहीद दर्जा राज्यातील विविध महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर देण्याबाबत आपण आदेश द्यावा, अशी विनंती युनियनचे अध्यक्ष आणि माजी आमदार सूर्यकांत महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मृतांच्या वारसदारांना तसेच जखमी जवानांना सवलती व फायदे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळण्याबाबतचे धोरण स्पष्ट करावे, याकडेही महाडिक यांनी लक्ष वेधले होते. तर वीरमरण आलेल्या तीन जवानांना शहीद दर्जा देण्याबाबतचा ठराव केडीएमसीच्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनीही एकमताने मंजूर केला होता. त्यानुसार या तीन जवानांना शहीद दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतला असून त्याप्रमाणे अध्यादेश जारी करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांनी अध्यादेश निघाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कोणत्या सवलती मिळणार?
तीन जवानांच्या कुटुंबीयांना एक सदनिका मोफत देण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील एकाला महापालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरीही देण्यात येईल. दोन मुलांचा शाळा-महाविद्यालयाचा खर्च सरकारतर्फे दिला जाणार आहे. तीनही जवानांचे वेतन दरमहा त्यांच्या कुटुंबांना मिळणार आहे. जवानांच्या निवृत्तीच्या दिनांकापर्यंत हे पूर्ण वेतन कुटुंबीयांना दिले जाणार आहे.
संबंधित व्यक्तीकडे मृत्यूच्या वेळी जे पद होते त्या पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नतीसाठी ज्या ज्या वेळी पात्र असेल त्यावेळी ती व्यक्ती पदोन्नती झाली, असे गृहीत धरून त्या व्यक्तीचे वेतन निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार निवृत्तीच्या दिनांकापर्यंत वेतन मिळणार आहे. या कालावधीत नियमानुसार वार्षिक वेतनवाढही मिळणार
आहे.

उशिरा का होईना घेतली दखल
आम्ही आमचा माणूस गमावला याचे दु:ख आयुष्यभर आमच्याबरोबरच राहणार आहे. पण त्यांच्या मृत्यूपश्चात सरकारने उशिरा का होईना दखल घेतली, याबाबत समाधान आहे. याकामी शिवसेनेचे दीपक सोनाळकर, मनसेचे रूपेश भोईर आणि काँग्रेसचे भिवंडी तालुक्यातील विजय बाळाराम पाटील यांचेही मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले होते. केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांचेही आभार, अशी प्रतिक्रिया दिवंगत प्रमोद वाघचौडे यांचे बंधू जगदीश यांनी दिली.

Web Title: The martyrdom status of 'those' soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.