रस्ते दुरुस्तीवर मनसे आक्रमक
By admin | Published: January 14, 2017 06:24 AM2017-01-14T06:24:55+5:302017-01-14T06:24:55+5:30
शहरातील कॅम्प नं.-४, जुन्या महाराष्ट्र बँकेसमोरील रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली डांबराविना खडी टाकली जात आहे.
उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं.-४, जुन्या महाराष्ट्र बँकेसमोरील रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली डांबराविना खडी टाकली जात आहे. याबाबतची तक्रार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांनी आयुक्तांकडे केल्यावर पुन्हा रस्ता दुरुस्तीचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. या प्रकाराने रस्ता दुरुस्तीतील घोळ समोर आला असून पालिका साडेचार कोटींतून प्रभागानुसार रस्त्याची दुरुस्ती व खड्डे भरत आहे.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी साडेचार कोटींची तरतूद केली होती. प्रभागानुसार रस्ता दुरुस्ती व खड्डे भरण्याची निविदा काढून दिवाळीनंतर कामाला सुरुवात केली. आयुक्तांच्या आदेशानुसार सर्वत्र कामे चांगल्या प्रकारे सुरू आहेत. मात्र, कॅम्प नं.-४, मुख्य मार्केट येथील जुन्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी डांबराविना खडी टाकून रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले. काही तासांतच खडी उखडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांनी कनिष्ठ अभियंता तरुण सेवकानी यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल बंद होता. तर, शहर अभियंता रामप्रसाद जैस्वाल पालिका कामात बिझी होते. अखेर, त्यांनी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून रस्त्याची निकृष्ट दुरुस्ती केल्याचे सांगून उखडलेल्या रस्त्याचे फोटो पाठवले. आयुक्तांनी याची दखल घेऊन रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याचा आदेश दिला. पालिकेच्या कंत्राटदाराकडून खासगी इमारतीच्या कॉलनीतील रस्ता दुरुस्ती केली जात आहे. त्याला कदम यांनी आक्षेप घेऊन आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)