मास्क: कारवाईसाठी पोलीस, पालिका कर्मचारी पोहोचले; पण पावती पुस्तकच विसरले...पुढे काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 01:58 PM2020-10-01T13:58:23+5:302020-10-01T13:59:43+5:30
पावती बुक नसल्याने पोलिस आणि नागरिक ताटकळत उभे राहिले
कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अनेक लोकं आहेत जे नियम पाळत नाहीत, मास्क लावत नाहीत. पोलीस आणि महापालिकेकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. आतापर्यंत लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीपण काही नागरिक ऐकायला तयार नाहीत. आज देखील कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बिनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण आपल्या पोलीस पथकासोबत पोहोचले.
जवळपास एक तास पोलिसांनी नियम मोडणाऱ्या नागरिकांना एका बाजूला उभं करून ठेवले होते. वारंवार विनंती करून देखील पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पावती बुक घेऊन पोहोचले नाहीत. पावती फाडण्याची जवाबदारी ही महापालिकेची असल्याने, पोलिस आणि नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. महापालिकेचा एक कर्मचारी याठिकाणी आला मात्र त्याच्याकडे पावती बुक नव्हते.
एका तासानंतर पालिकेचे अधिकारी भागाजी भांगरे पोहचले. भांगरे यांना पोलीस अधिकाऱ्यांनी खडेबोल सुनावले. तुम्हाला काम करायचं नसेल तर नका करू, आम्हालाही कामाला नका लावू, एक पावती पुस्तक घेऊन यायला एक तास लागतो ही कामाची पद्धत नाहीये. कृपा करून असं करू नका, अशा शब्दांत झापले. यानंतर देखील महापालिकेचे अधिकारी शिस्त पाळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.