मसाज मशीनचा प्रकल्प वेधून घेतोय लक्ष; विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:54 AM2019-12-10T01:54:46+5:302019-12-10T01:55:04+5:30
गावदेवी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी अगदी किरकोळ खर्चात करता येईल, असा प्रकल्प मांडला आहे.
डोंबिवली : पश्चिमेतील गावदेवी विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणत्याही वेदनेवर आराम मिळेल, असा मसाज मशीनचा प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
तोंडवळकर विद्यावर्धिनी आणि कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागांतर्गत समूहसाधन केंद्र सीआरसी, क्रमांक ८, मोठागाव ठाकुर्ली यांच्यातर्फे तोंडवळकर विद्यावर्धिनी शाळेत सोमवारी शहरातील पश्चिमेतील शाळांचे विज्ञान प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेविका सरोज भोईर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात पश्चिमेतील १६ शाळांमधील १६ प्रकल्प सादर केले आहेत. हे प्रदर्शन मंगळवारपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.
गावदेवी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी अगदी किरकोळ खर्चात करता येईल, असा प्रकल्प मांडला आहे. कोणत्याही वेदनेवर डॉक्टरांकडे गेल्यास अधिक पैसे मोजावे लागतात. त्यापेक्षा कमी पैशांत मसाज मशीनने आराम मिळू शकतो, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एक रिकामा डबा, मोटार, एक व्होल्ट बॅटरी, कॅ प, वायर, धातूची चकाकी, अशा साधनांचा वापर त्यासाठी केला आहे.
‘स्वच्छ भारत अभियाना’ला हातभार कसा लागू शकेल, असा प्रकल्प वेलंकनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केला आहे. या प्रकल्पात पाण्यात कचरा जमा झाल्यास कंटेनरद्वारे तो कसा गोळा केला जाऊ शकतो, हे सांगितले आहे. त्यामुळे जलवाहतुकीचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय, त्यांनी दुसरा गणितीय प्रकल्पही मांडला होता. ज्ञानेश्वरी विद्यालयाने ‘इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट’ या विषयावर प्रकल्प सादर केला. लोकप्रिय विद्यालयाच्या प्राथमिक विद्यार्थ्यांनी ‘वाहतुकीचे संसाधन’ यावर प्रकल्प सादर क रून हायड्रोलिक ब्रिज स्थापन केल्यास जलवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल, हे नागरिकांना पटवून दिले. त्यामुळे परिणामी पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल. सेंट मेरीज शाळेने ‘मंगलयान’ तर, आॅक्सफर्ड शाळेने आजीबाईच्या बटव्यातील औषधे कशी कोणत्या रोगांवर गुणकारी आहेत, हे पटवून दिले. त्यात त्यांनी भारतात सर्वांधिक रुग्ण असलेल्या मधुमेह आणि हृदयरोग यांची माहिती दिली आहे.
लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय, महापालिकेची शाळा क्रमांक २० मोठागाव, ठाकुर्ली यांनी ‘सौरऊर्जेचा वापर’ या विषयावर प्रकल्प सादर करून विजेची बचत कशी करावी, हे सांगितले. डॉन बॉस्को शाळेने सध्या वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी एक विशेष रुग्णवाहिका सादर केली आहे. हे सर्व प्रकल्प नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या विज्ञान प्रकल्पातील कोणता प्रकल्प अव्वल ठरणार, हे मंगळवारीसमजणार आहे.
म्हात्रे, पांडुरंग विद्यालयातही प्रदर्शन
केडीएमसीतर्फे १० आणि ११ डिसेंबरला चरूबमा म्हात्रे विद्यालय, कोपर, ११ आणि १२ डिसेंबरला जोंधळे शाळा, ठाकुर्ली (पश्चिम), तर १२ आणि १३ डिसेंबरला पांडुरंग विद्यालय येथेही विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत.