ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत; सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 10:29 PM2022-09-30T22:29:57+5:302022-09-30T22:35:06+5:30
साडेसातनंतर रेल्वे पूर्ववत झाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.
जितेंद्र कालेकर
ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठाण्याहून कल्याणकडे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची वाहतूक ठप्प झाली. यामुळे कार्यालये सुटण्याच्या वेळी प्रवाशांना सायंकाळी ६.३७ ते ७.३३ या एक तासांच्या कालावधीमध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर अडकून पडावे लागले. यामुळे अप व डाऊन मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमध्ये तासन् तास अडकून पडल्याने प्रवासी उकाड्याने अक्षरश: हैराण झाले.
ठाणे व कळवादरम्यान सिग्नल यंत्रणेत ६.३७ वाजता बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद व धीम्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. ठाण्याकडे येणाऱ्या लोकल मुलुंड स्थानकातच थांबविण्यात आल्यामुळे रेल्वेच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.
सुरुवातीला ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल सेवा थांबविण्यात आली. त्यानंतर फलाट क्रमांक तीन, चार आणि पाचवरही अशीच समस्या उद्भवल्यामुळे अप व डाऊन मार्गावरील जलद व धीमी सेवा बंद झाली. सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी तब्बल तासभर रेल्वे ठप्प झाल्याने नोकरदारांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनी रिक्षा, टँक्सी, ओला व उबर या माध्यमातून घर गाठण्याचा प्रयत्न केला. रेल्वे ठप्प झाल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांनी अवाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांना लुबाडले. ओला, उबरची मागणी वाढल्याने त्यांच्याही दरात वाढ झाली. ज्यांना या माध्यमातून घर गाठणे शक्य नव्हते ते रेल्वे सेवा पूर्ववत होण्याची वाट पाहत गाडीत अथवा फलाटावर बसून होते.
साडेसातनंतर रेल्वे पूर्ववत झाली. मात्र, रात्री उशिरापर्यंत रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. नेमका कशामुळे हा बिघाड झाला, याचे काहीच उत्तर रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांना देता येत नसल्याची तक्रार संतप्त प्रवाशांनी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या पोलीस पथकासह रेल्वे सुरक्षा दलाची जादा कुमक तैनात केली होती.