‘प्लास्टिक वापरू नका’च्या बोर्डवरच प्लास्टिकचे डबे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 08:58 AM2024-07-12T08:58:35+5:302024-07-12T08:59:05+5:30
टिकुजिनीवाडीतील वनविभागाच्या जागेवर माेठ्या प्रमाणात अतिक्रमण
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजत असताना आता टिकुजिनीवाडी परिसरात वनविभागाने आपल्या हद्दीत लावलेल्या फलकावर ‘अतिक्रमण करू नका, प्लास्टिक वापरू नका’ अशी सूचना ठळक अक्षरात लावली आहे. परंतु दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणे त्या फलकालाच भंगारातील प्लास्टिक डबे लटकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. फलकाच्या बाजूला म्हणजेच वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. येथून रोजच्या रोज ये-जा करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र कदाचित ते अतिक्रमण दिसत नसावे.
टिकुजिनीवाडीचा परिसर डोंगराळ आहे. याठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द सुरू होते. परंतु मागील काही वर्षांत या भागात झपाट्याने विकास झाला. अगदी वनविभागाच्या हद्दीलगत मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी आपली हद्द कुठून सुरू होते, हे समजावे याकरिता त्या ठिकाणी फलक लावले आहेत. या फलकावर ‘अतिक्रमण करू नका’, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच या क्षेत्रात प्लास्टिक वापरू नये, वृक्षतोड करू नये असे फलकावर नमूद केले आहे. त्यामुळे वन्यजीवांना धोका पोहोचू शकतो.
त्यामुळे असे केल्याचे आढळल्यास कमीत कमी २५ हजारांचा दंड तसेच ३ ते ७ वर्षांचा कारावास होऊ शकतो, असेही लिहिले आहे. मात्र, अतिक्रमण करणाऱ्यांनी या फलकावरील सूचना ना वाचल्या आहेत ना त्यांना कायद्याची जराही भीती आहे. या फलकावर चक्क प्लास्टिकच्या डब्यांची माळ घातली आहे. मात्र ती डब्यांची माळ हटविण्याचे धाडस वनविभाग दाखवत नाही.
हाकेच्या अंतरावरच कार्यालय
दक्ष नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, टिकुजिनीवाडी येथे अतिक्रमण केले आहे. हाकेच्या अंतरावर वनविभागाचे कार्यालय आहे. अधिकारी वर्ग याच रस्त्यावरून रोज ये-जा करतात. परंतु त्यांना ही अतिक्रमणे दिसत नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात वनविभागाच्या संबंधित कार्यालयाशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.