प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग
By पंकज पाटील | Published: October 24, 2022 10:48 PM2022-10-24T22:48:32+5:302022-10-24T22:50:46+5:30
दिवाळीच्या फटाक्यामुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे...
अंबरनाथ: अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात असलेल्या एका प्लास्टिकच्या गोदामाला आज सायंकाळी 8.45 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजले नसले तरी दिवाळीच्या फटाक्यामुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अंबराच्या बुवापाडा परिसरामध्ये भंगार गल्ली नावाची मोठी वसाहत असून त्या ठिकाणी मोठमोठे गोदाम असून त्या ठिकाणी एमआयडीसी परिसरातील सर्व भंगार एकाच ठिकाणी गोळा केला जातो. प्लास्टिकचे ड्रम, लहान प्लास्टिकचे डबे पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक या सोबत इतर अनेक साहित्य या ठिकाणी एकत्रित केले जाते. अशाच एका गोदामाला आज सायंकाळी 8.45 मिनिटांनी अचानक आग लागली. या गोदामात सर्व प्लास्टिकचे साहित्य असल्यामुळे क्षणार्धात संपूर्ण गोदाम आगीच्या भक्षस्थानी आले. या घटनेची माहिती मिळतात अंबरनाथ एमआयडीसी आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. अर्धा तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली असून या आगीमुळे कोणालाही इजा झालेली नाही. मात्र गोदामात असलेल्या प्लॅस्टिकच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळीतील जळते फटाके या गोदाममध्ये पडून ही आग लागल्याची शक्यता स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.