भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग; आगीत वाहने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली
By नितीन पंडित | Published: February 15, 2024 06:23 PM2024-02-15T18:23:24+5:302024-02-15T18:24:13+5:30
ठाकराचा पाडा येथील रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत भंगार साठवणुकीचे गोदाम असून गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास येथे अचानक आग लागली.
भिवंडी: शहरालगतच्या ठाकराचा पाडा येथील भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गोदामासह नजीक असलेल्या वाहन पार्किंग मधील अनेक वाहनांना भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी घडली आहे.या आगीत गोदामातील साहित्यासह , वाहने जाळून खाक झाली आहेत.सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
ठाकराचा पाडा येथील रस्त्यालगत एका मोकळ्या जागेत भंगार साठवणुकीचे गोदाम असून गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास येथे अचानक आग लागली. या आगीत भंगार गोदामात साठवलेले काही केमिकल जळत असल्याने ही आग झपाट्याने पसरत नजीकच असलेल्या वाहनतळ व नजीकच्या बंगल्या पर्यंत पोहचली.या घटनेची माहिती मिळताच भिवंडी पालिकेची एक अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.परंतु तो पर्यंत ही आग पसरत गेली.स्थानिकांनी बंगल्यातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले व त्यानंतर अनेक वाहन उचलून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. या मध्ये एक जीप,दोन ट्रक,चार दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.दरम्यान या दुर्घटने नंतर घटनास्थळी एकमात्र अग्निशामक दलाची गाडी पोहचल्याने घटनास्थळी पोहचलेले माजी नगरसेवक कमलाकर पाटील यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
अग्निशामक दलाची वाहने बंद
घटनास्थळी अग्निशामक दलाचे एकच गाडी आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या बाबत वर्दी वर असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानां कडे चौकशी केली असता अग्निशमन दलाची तीन वाहने बंद असल्याने व शहरात एक वाहन ठेवणे बंधनकारक असल्याने एकच गाडी घटनास्थळी आल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.पालिकेच्या ताफ्यात मागील एका वर्षातच दोन जंबो अग्निशामक दलाची वाहन दाखल झाली असताना ती सुध्दा अग्निशमन दलाचे फायर इंजिन बंद कसे असा सवाल उपस्थित होत आहे.