भिवंडीत प्लास्टिक गोदामात अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:33 AM2018-12-03T11:33:00+5:302018-12-03T18:22:35+5:30

भिवंडीमध्ये राहनाल गावाच्या हद्दीतील प्लास्टिक गोदामामध्ये भीषण आग लागली आहे.

massive fire breaks out in plastic godown in Bhiwandi | भिवंडीत प्लास्टिक गोदामात अग्नितांडव

भिवंडीत प्लास्टिक गोदामात अग्नितांडव

Next
ठळक मुद्देराहनाल गावाच्या हद्दीतील प्लास्टिक गोदामामध्ये भीषण आग लागली. गोदामामध्ये केमिकलचा साठा असल्यानं आगीनं रौद्ररुप धारण केले आहे. आगीत लाखो रूपयांचा माल जळून भस्मसात झाला.

भिवंडी - राहनाल गावाच्या हद्दीतील प्लास्टिक गोदामामध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. गोदामामध्ये केमिकलचा साठा असल्यानं आगीनं रौद्ररुप धारण केले आहे. आगीमुळे परिसरात मोठे-मोठे धुराचे लोट पसरले आहेत. भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत मणीबाई कंपाऊण्ड येथे प्लास्टिक मणी,प्लास्टिक दाणे व केमीकलचा साठा असलेल्या बंद गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली.या आगीत लाखो रूपयांचा माल जळून भस्मसात झाला. सदर गोदामाजवळ असलेल्या पेट्रोलपंपा जवळ आगीचे लोण जाऊ नये म्हणू्न अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थ केली. तर हा पेट्रोलपंप महामार्गालगत असल्याने भिवंडी-ठाणे मार्गावर वहानांची मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

भिवंडी-ठाणे महामार्गावरील रहानाळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने बेकायदेशीरपणे बांधकाम करून साठवणूक केलेल्या केमिकलची गोदामे आहेत.वारंवार या गोदामांना सुरक्षिततेच्या अभावी आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. आज सकाळी रिलायन्स पेट्रोलपंपाच्या मागे मनीबाई कंपाऊंड येथील घर क्रमांक ९१२/८ या मुकेश गुप्ता यांच्या मालकीच्या गोदामास आग लागली. या गोदामात प्लास्टिक मणी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल, मण्यांना रंग देण्यासाठी लागणारे केमिकल तसेच बनविलेल्या मोत्यांच्या माळा व इतर साहित्य साठविलेले होते. या बंद गोदामांतून अचानकपणे धूर निघून लागल्याने परिसरांतील गोदाम कामगारांनी आग लागल्याची खबर स्थानिक लोकांसह पोलिसांना दिली.

पोलिसांनी तातडीने मनपाच्या अग्निशामक दलास घटनास्थळी रवाना केले. तोपर्यंत गोदामातील आगीने रौद्ररूप धारण केले. केमिकलच्या ड्रमचे स्फोट होऊ लागल्याने गोदामाचे पत्र्याचे छप्पर कोसळले आणि परिसरांत मोठ्या प्रमाणांत धूर पसरला.आगीच्या ज्वाळा पसरू लागल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. ही आग विझविण्यासाठी कल्याण,डोंबीवली व ठाणे येथील अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. परंतू मनपाच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. सदर आग लागलेल्या गोदामापासून काही अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाला तसेच गोदामांतील कामगारांना आणि परिसरांतील नागरिकांना धोका निर्माण होऊ नये म्हणू त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. रिलायन्स पेट्रोलपंप हा भिवंडी-ठाणे मार्गालगत असल्याने या मार्गावरील वाहातूकीला देखील धोका निर्माण झाल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याबरोबर मॅकेनिकल फोमचा वापर करून ही आग दुपारी अडीच वाजता आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, या गोदाम कंपाऊंडमध्ये हमालीचे काम करणाऱ्या दोन मद्यपी हमालांमध्ये झालेल्या भांडणात एका हमालाने माचीसची जळती कांडी या गोदामात फेकल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. त्या दिशेने नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत. परंतू या गोदामांत केमिकल व ज्वलनशील पदार्थ असताना देखील गोदाम मालकाने आगप्रतिबंधक उपाय योजना केली नसल्याचे सांगितले जाते.

 

Web Title: massive fire breaks out in plastic godown in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.