भिवंडीत इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला भीषण आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
By नितीन पंडित | Updated: January 13, 2024 18:38 IST2024-01-13T18:38:34+5:302024-01-13T18:38:55+5:30
धामणकर नाका परिसरात सिटी सेंटर या पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यावर हि आग लागली होती.

भिवंडीत इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला भीषण आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
भिवंडी: शहरातील धामणकर नाका परिसरात एका पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या मीटर बॉक्स रूम मध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेने परिसरासह संपूर्ण इमारतीत एकच खळबळ उडाली होती. धामणकर नाका परिसरात सिटी सेंटर या पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यावर हि आग लागली होती. ही इमारत व्यवसायिक असून या इमारतीत कोचिंग क्लासेस, दवाखाना , विविध कार्यालय तसेच भाजप आमदार महेश चौगुले यांचे जनसंपर्क कार्यालय देखील आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर जिन्याच्या बाजूला मीटर बॉक्स रूम आहे आणि या मीटर बॉक्समध्ये अचानक आग लागल्याने इमारतीत धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते.
आग लागल्याने इमारतीत क्लासेस, दवाखाना ,विविध कार्यालय यामधील नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मात्र स्थानिकांच्या मदतीने नागरिक व विद्यार्थ्यांना सुखरूप इमारतीच्या बाहेर काढण्यात आले, आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल होत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवल्याने नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असून मोठी जीवित हानी या दुर्घटनेतून टळली आहे.