बनावट नोटांचा ‘मास्टरमाइंड’ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 03:35 AM2018-07-09T03:35:21+5:302018-07-09T03:35:42+5:30
घरमालकाशी झालेल्या वादातून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कोठून आणले, याची चौकशी सुरू असताना गोळीबार करणारा आशीष शर्मा (३०, रा. दिवा) हा बनावट नोटा तयार करणारा ‘मास्टरमाइंड’ असल्याची खळबळजनक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली.
ठाणे / मुंब्रा - घरमालकाशी झालेल्या वादातून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कोठून आणले, याची चौकशी सुरू असताना गोळीबार करणारा आशीष शर्मा (३०, रा. दिवा) हा बनावट नोटा तयार करणारा ‘मास्टरमाइंड’ असल्याची खळबळजनक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्याच्याकडून २०००, १००, २०० रुपये दर्शनीमूल्य असलेल्या एक लाख नऊ हजार ६५० रुपयांच्या बनावट नोटाही हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली.
घोडबंदर रोड येथे वास्तव्यास असलेल्या संजीवकुमार गुप्ता यांची दिव्यात रूम आहे. तिथे आशीष शर्मा हा भाडेकरू म्हणून वास्तव्याला होता. या दोघांमध्ये वाद झाला. शर्माने ५ जुलै रोजी दिव्यातील अनिल अपार्टमेंटमध्ये गुप्तावर गोळी झाडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर चौकशी केली असता, तो आपल्या घरातच बनावट नोटा तयार करतो, हे कळले. त्या नोटांची देवाणघेवाण करताना धोका निर्माण झाल्यास स्वत:च्या सुरक्षेसाठी एक गावठी कट्टा आणि १५ जिवंत काडतुसेही खरेदी केल्याची कबुलीच त्याने दिली. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. तेव्हा तिथे २००० च्या २२, २०० च्या १८८, तसेच १०० च्या ३३२, पन्नासच्या १४५, वीस रुपयांच्या ५३ आणि दहा रुपयांच्या ५४ अशा एक लाख नऊ हजार ६५० इतक्या दर्शनीमूल्य असलेल्या ७२४ बनावट नोटा तसेच त्या तयार करण्यासाठी वापरलेला स्कॅनर, प्रिंटर, कैची आणि पेन आदी साहित्य तसेच एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले.
भोईवाड्यातही गुन्हा
शर्मा या भाडेकरूचा गुप्ता (घरमालक) याच्याशी दोन हजार रुपयांवरून वाद झाला होता. गुप्ताने घरासाठी सहा हजार रुपये अनामत रक्कम घेतली होती. त्यातील चार हजार त्याने शर्माला परतही केले होते.
घराची साफसफाई केल्यानंतर उर्वरित दोन हजार रुपयेदेखील घेऊन जा, असेही त्याने शर्माला सांगितले. यातूनच त्याने गुप्ताला मारहाणही केली होती.
हाच वाद चिघळल्यानंतर त्याने त्याच्यावर थेट गोळीबार करून त्याच्या खुनाचाही प्रयत्न केला. शर्मावर मुंबईच्या भोईवाडा पोलीस ठाण्यातही हाणामारीचा गुन्हा दाखल असल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.