मतदारयादीत नाव नसल्याने उमेदवारी गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:45 AM2017-07-29T01:45:56+5:302017-07-29T01:45:59+5:30
मतदार यादीतल नाव आयोगाने वगळल्याने भाजपाच्या एक तर शिवसेनेच्या दोघा महिलांची उमेदवारीच संपुष्टात आली आहे. या तिन्ही महिलांची उमेदवारी निश्चित मानली जात होती व त्यांनी प्रचारही सुरू केला होता
मीरा रोड : मतदार यादीतल नाव आयोगाने वगळल्याने भाजपाच्या एक तर शिवसेनेच्या दोघा महिलांची उमेदवारीच संपुष्टात आली आहे. या तिन्ही महिलांची उमेदवारी निश्चित मानली जात होती व त्यांनी प्रचारही सुरू केला होता. पण मतदारयादीत नाव नसल्याने निवडणूकच लढवता येणार नसल्याने आता नेत्यांकडून अन्य उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे.
मीरा- भार्इंदर महापालिका निवडणुकीआधी मनसेचे पदाधिकारी विक्रम कृपाळ हे शिवसेनेत आले. तर मनसेचे दुसरे पदाधिकारी महेंद्र गुर्जर हे भाजपात गेले होते. परंतु स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांवर टीका करत गुर्जर हे शिवसेनेत दाखल झाले. कृपाळ व गुर्जर हे दोघेही माजी उपनगराध्यक्ष अरूण कदम यांचे समर्थक मानले जातात. त्यांना सेनेत आणण्या मागे कदम यांचे प्रयत्न होते.
तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष असलेल्या संगीता धाकतोडे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपाचा रस्ता धरला.
महापालिका निवडणुकीसाठी गुर्जर यांच्या पत्नी संजना यांना भार्इंदर पूर्वेतील प्रभाग ४ मधून शिवसेनेने उमेदवारी पक्की केली होती. तर कृपाळ यांच्या पत्नी दर्शना यांना मीरा रोडच्या प्रभाग १८ मधुन सेनेने उमेदवारी निश्चित केली होती. गुर्जर व कृपाळ या दोन्ही महिला उमेदवारांनी प्रभागात तसेच सोशल मिडियावर प्रचारही सुरू केला होता.
मीरा रोडच्या प्रभाग १३ मधून भाजपाने धाकतोडे यांचे नाव निश्चित केले होते. धाकतोडे यांनीही सहकारी भाजपा उमेदवारांसह प्रचार सुरू केला होता.
परंतु मतदारयादीतून या तिन्ही उमेदवारांची नावेच कमी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि त्यांना धक्काच बसला. मतदारयादीतच नाव नसल्याने निवडणूक लढवता येणार नाही हे स्पष्ट झाल्याने आता शिवसेना व भाजपा नेतृत्वाने या प्रभागातून नवीन महिला उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे.
या इच्छुकांची घरच्या जुन्या पत्त्यावर मतदारयादीत नाव होती. पण दुसरीकडे राहयला गेल्यावर रितसर अर्ज करून पत्ता बदलून घ्यायला हवा होता. शिवाय निवडणुकीत उभे राहयचे म्हणून या इच्छुक उमेदवार तसेच त्यांच्या पतींनीही मतदारयादीत नाव आहे की कमी झाले? याची वेळोवेळी पडताळणीच केलेली नाही.