माता-बालमृत्यू प्रकरण; प्रशासनाचे धाबे दणाणले; पीडित कुटुंबाचे जि.प. अध्यक्षांकडून सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 07:05 AM2024-01-21T07:05:23+5:302024-01-21T07:05:34+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शनिवारी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
मोखाडा : गर्भवती आदिवासी महिलेचा उपचाराअभावी पोटातील बाळासह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाचे धाबे दणाणले असून, आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शनिवारी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
ही घटना दुःखद असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन निकम यांनी त्यांना दिले. मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या देवबांधलगत आडोशी- शिरसगाव ग्रामपंचायतींतर्गत गणेशवाडी येथील गर्भवती माता रूपाली रोज (२५) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सर्वत्र हळहळ
रूपालीच्या पोटात दुखू लागल्याने तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले; परंतु तिथे डॉक्टरांकडून कोणताही उपचार करण्यात आला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर गर्भवतीला घरी नेले व दुसऱ्या दिवशी मोखाडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले; परंतु बाळ गर्भात मृत झाल्याचे मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भरतकुमार महाले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यानंतर तिला तत्काळ नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. तेथे ३ ते ४ दिवसांच्या उपचारानंतर त्या गर्भवतीचाही शुक्रवारी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, या प्रकरणाच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.