नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:16 PM2020-12-29T23:16:03+5:302020-12-29T23:16:09+5:30
लोकल ट्रेन बंद असल्यामुळे पर्यटक आपल्या खासगी वाहनाने माथेरानला येऊ लागले आहेत.
कर्जत : पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन माथेरान असल्यामुळे पर्यटकांचा ओघ नेहमी माथेरानकडे असतो. या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक नाताळपासूनच माथेरानमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी पर्यटकांच्या सेवेसाठी माथेरान सज्ज झाले आहे.
लोकल ट्रेन बंद असल्यामुळे पर्यटक आपल्या खासगी वाहनाने माथेरानला येऊ लागले आहेत. येथील पार्किंगची व्यवस्था तोकडी पडत असल्याने येथील जुम्मापट्टी येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. ख्रिसमस आणि त्याला लागून आलेला शनिवार व रविवार या तीन दिवसात पर्यटक फार मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये दाखल झाले होते. या तीन दिवसात १५ हजार १०८ पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये येतील, असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सर्व दुकाने, रेस्टॉरंट व हॉटेल्स सजली असून पर्यटकांना सेवा देत आहेत. मिनीट्रेनकडे पर्यटकांचा वाढता कल पाहता मध्य रेल्वेनेही अप-डाऊन मार्गावर दोन फेऱ्यांची वाढ केली आहे. नगरपालिकेने प्रवेशद्वार दस्तुरीवर ऑक्सिमीटर आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. हॉटेलचे रूम्स सॅनिटाईझ केले जात आहेत. हॉटेलमध्ये आल्यानंतर पर्यटकांची ऑक्सिमीटरने तपासणी केली जात आहे. हॉटेलची सजावट करण्यात येत आहे. अनेक प्रकारचे मनोरंजन करण्याच्या तयारी सुरू झाल्या आहेत.