17 महिन्यांनी माथेरानमध्ये धावली मिनी ट्रेन! अमन लॉज ते माथेरान मार्केटदरम्यानन झाली पहिली फेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 11:15 AM2017-10-30T11:15:39+5:302017-10-30T11:24:27+5:30
माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरु झाली आहे. माथेरान फिरायला येणारे पर्यटक नेरळ स्टेशनला उतरल्यानंतर त्यांची पहिली पसंती मिनी ट्रेनला असते.
नेरळ - माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरु झाली आहे. माथेरान फिरायला येणारे पर्यटक नेरळ स्टेशनला उतरल्यानंतर त्यांची पहिली पसंती मिनी ट्रेनला असते. कारण घनदाट जंगलातून धावणा-या या मिनी ट्रेनमधून माथेरानचे खरे सौंदर्य उलगडते. सोमवारी सकाळी अमन लॉज ते माथेरान मार्केट या साडेतीन किलोमीटरच्या पट्ट्यात मिनी ट्रेनने पहिली फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली.
तब्बल 17 महिन्यांनी पुन्हा एकदा माथेरान मार्गावर मिनी ट्रेन सुरु झाली आहे. मागच्यावर्षी दोनवेळा मिनी ट्रेन रुळावरुन घसरल्यानंतर मे 2016 पासून मिनी ट्रेनच्या फे-या बंद करण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात अमन लॉज ते माथेरान मार्केट दरम्यान मिनी ट्रेन धावेल. त्यानंतर नेरळ रेल्वे स्टेशनपर्यंत मिनी ट्रेनच्या फे-या सुरु होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. या मिनी ट्रेनचे सेकंड क्लासचे भाडे प्रौढांसाठी 45 रुपये, मुलांसाठी 30 रुपये असेल तर फर्स्ट क्लासमध्ये प्रौढांना 300 रुपये, मुलांना 180 रुपये आकारले जातील.
रविवारी नेरळ ते माथेरान दरम्यान मध्य रेल्वेने ट्रायल रनची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. माथेरान हे मुंबई जवळचे थंड हवेचे ठिकाण असल्याने इथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. मे महिना आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांच्या शाळांना सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्या वाढते. मिनी ट्रेन सुरु झाल्यानंतर पर्यटकांना फायदा होईल. ज्या पर्यटकांना घोडयावर बसायला जमत नाही त्यांना चांगला पर्याय मिळेल असे मध्य रेल्वेचे जनसंर्पक अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.