मटकी, सफेद वाटाणा महाग तर चणाडाळ, चणे झाले स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 12:57 AM2021-02-08T00:57:55+5:302021-02-08T00:58:00+5:30
कोबी स्वस्त तर फ्लॉवर महाग : भाज्या, किराणा मालात चढउतार
ठाणे : ठाणे : गेल्या आठवड्यापासून कडधान्य महाग झाली आहेत. या आठवड्यातही तीच परिस्थिती आहे. मटकी, सफेद वाटाणा महाग तर चणाडाळ, चणे स्वस्त झाले आहे. फळांमध्ये डाळिंब, सफरचंद महागच आहे. कोबी स्वस्त तर फ्लॉवर महाग झाला आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.
भाज्यांप्रमाणे किराणा मालातही अनेक दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहे. फळांमध्ये फार फळांचे दर कमी किंवा जास्त झाले नसले तरी डाळिंब, सफरचंद महाग आहेत असे फळविक्रेत्यांनी सांगितले.
एकीकडे सिमला मिरची, भेंडी, कोबी या भाज्यांचे दर कमी झाले आहेत तर दुसरीकडे भरली मिरची, टोमॅटो, फ्लॉवरचे दर वाढले असल्याचे भाजी विक्रेते ऋषिकेश खांबे यांनी सांगितले.
तेलाचे दर अजून वाढलेलेच आहेत. कडधान्यामध्ये एकीकडे मटकी, सफेद वाटाणा महाग तर दुसरीकडे चणाडाळ, चणे स्वस्त झाले असल्याचे किराणा विक्रेत्या पूनम मोरे यांनी सांगितले. यामुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात समाधान आहे.
मटकी १३० रुपये किलाे
मटकीचे होलसेल दर १२० रुपये किलो तर किरकोळ १३० रुपये किलो, सफेद वाटाणा होलसेल दर ८८ ते ९० रुपये किलो तर किरकोळ १०० रुपये किलो, चणाडाळ ६४ रुपये किलो तर किरकोळ दर ७५ रुपये तर चणे होलसेलमध्ये ५५ रुपये किलो आहे.
डाळिंब, सफरचंद महागच
डाळिंब आणि सफरचंदाचे दर हे गेल्या आठवड्याप्रमाणे आहेत. ही दोन्ही फळे सध्या महागलेली आहेत. संत्री आणि स्ट्रॉबेरी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत व दरही स्वस्त असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले.
भेंडी ४० रुपये
सिमला मिरची होलसेलमध्ये ४० तर किरकोळमध्ये ६० ते ७० रुपये किलो, भेंडी होलसेलमध्ये ४० तर किरकोळमध्ये ६० ते ७० रुपये किलो, कोबी १० रुपये किलो तर किरकोळमध्ये २० ते २५ रुपये किलो, टोमॅटो २० तर किरकोळमध्ये ४० किलो, फ्लॉवर १० ते १५ रुपये नग तर किरकोळमध्ये ३० ते ४० रुपये तसेच भरली मिरची होलसेलमध्ये १० ते १५ रुपये किलो आहे.
भेंडीच्या दरात फार घट झाली नसून १ ते २ रुपयांनी कमी झाली आहे. स्वस्त असलेले टोमॅटो पुन्हा महाग झाले आहेत. फ्लॉवर १० रुपयांनी विकला जात होता त्याचेही दर वाढले आहेत.
- ऋषिकेश खांबे , भाजी विक्रेते
मटकी १० रुपयांनी, सफेद वाटाणा ६ रुपयांनी वाढले आहे तर चणाडाळ आणि चणे याच्या दरात प्रत्येकी ५ रुपयांनी घट झाली आहे.
- पूनम मोरे,
किराणा विक्रेत्या