वरसावे पुलाच्या दुरुस्तीला उद्याचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 01:17 AM2018-12-02T01:17:53+5:302018-12-02T01:18:06+5:30
मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे खाडीपूल दुरु स्तीचा मुहूर्त विविध कारणांमुळे अजून यंत्रणांना सापडलेला नाही.
मीरा रोड : मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे खाडीपूल दुरुस्तीचा मुहूर्त विविध कारणांमुळे अजून यंत्रणांना सापडलेला नाही. अवजड वाहनांना रोखण्यासाठी तीन नाक्यांवर तयार केलेले ओव्हरहेड गेटरिंग सदोष असल्याने त्यात सुधारणा करण्याच्या सूचनेमुळे दुरु स्तीच्या मुहूर्ताचा नारळ सोमवारी फुटण्याची माहिती सूत्रांनी दिली.
वसई खाडीवरील मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणारा नवीन पूल
दुरुस्तीसाठी २६ नोव्हेंबरपासून एक महिन्यापर्यंत अवजड वाहनांसाठी बंद करण्याची अधिसूचना पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी जाहीर केली होती. शिवाय, पुलावर लहान वाहनांसाठी एकच मार्गिका सुरू ठेवून दुसºया मार्गिकेच्या ठिकाणी दुरुस्ती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वास्तविक, या पुलाच्या जॉइंट प्लेट नादुरु स्त झाल्या असून त्यावर कामचलाऊ म्हणून डांबराचा थर टाकून भार वाढवल्याने पुलाची दुरु स्ती अत्यावश्यक बनली आहे.
महामार्ग प्राधिकरण अनेक महिन्यांपासून या दुरुस्तीसाठी पालघर व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तगादा लावत असले, तरी विविध कारणांनी दुरु स्तीसाठी चालढकल केली गेली. पण, दुरु स्तीसाठी चाललेली टोलवाटोलवी गंभीर असल्याने अखेर २६ नोव्हेंबरपासून अवजड वाहनांसाठी पूल बंद करणे व एका मार्गिकेतून लहान वाहने सुरू ठेवणे तसेच मोठी वाहने चिंचोटी, शिरसाड व मनोरनाक्यावरून भिवंडीमार्गे ठाणे-मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाचा व प्रचंड वाहतूक असलेला पूल बंद होणार म्हणून वाहतूक व स्थानिक पोलिसांनी आपापल्या भागात वाहतुकीचे नियोजन व व्यवस्थेची तयारी चालवली. दुरु स्तीसाठी साहित्य व यंत्रणा यांची जमवाजमव झाली. त्यासाठी सुरुवातीचे दिवस वाया गेले. दुसरीकडे पोलिसांना ट्रॅफिक वॉर्डन मिळत नसल्याची बाब समोर आली.
आता चिंचोटी, शिरसाड व मनोरनाक्यावर अवजड वाहनांना रोखण्यासाठी बनवलेले ओव्हरहेड गेटरिंग सदोष असल्याने महामार्ग पोलिसांनी त्यास आक्षेप घेतला. गेटरिंग असल्याचे चालकास अर्धा किलोमीटर लांबून दिसेल, असे त्यावर दिवे लावण्याची सूचना यात महत्त्वाची होती.
>मुंंब्रा बायपास जड-अवजड वाहनांसाठी आज बंद
मुंब्रा बायपासमार्गे ठाणे शहरात येणाºया जड-अवजड वाहनांसाठी २ डिसेंबर रोजी प्रवेश बंद केला असल्याचे पोलीस उपायुक्त वाहतूक सुनील लोखंडे यांनी सांगितले. कल्याण येथे शुक्रवारपासून सुरू असलेला आगरी कोळी महोत्सव तसेच २ डिसेंबर रोजी या महोत्सवाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक २ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत कळंबोली, महापे येथून ऐरोलीमार्गे वळवण्यात आली आहे.
>शनिवार, रविवार
अधिक वाहतूक
पोलिसांनी सुचवल्यानुसार गेटरिंग बनवण्यास घेण्यात आले आहे. त्यातच, शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी वाहतूक जास्त असल्याने सोमवारपासून पूलदुरु स्तीचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे पोलीस व महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.