उल्हासनगर महापालिकेतील महापौर अन् उपमहापौरांची दालने लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 04:02 PM2022-04-06T16:02:25+5:302022-04-06T16:05:02+5:30
उल्हासनगर : महापालिकेची मुदत ४ एप्रिलला संपल्यानंतर मालमत्ता विभागाने सायंकाळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, विविध ...
उल्हासनगर : महापालिकेची मुदत ४ एप्रिलला संपल्यानंतर मालमत्ता विभागाने सायंकाळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, विविध पक्षांचे गटनेते कार्यालये लॉक केली. महापालिकेत बसण्यासाठी नेत्यांना यापुढे हक्काचे कार्यालय नसणार आहे. साेमवारी सायंकाळी आठवण म्हणून पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्या समवेत फोटो सेशन्स केले.
उल्हासनगर महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी एक आठवडा आदी मालमत्ता विभागाने महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह विविध पक्षांच्या गटनेत्यांना नोटीस देऊन कार्यालय ४ एप्रिलला सायंकाळपर्यंत खाली करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते यांच्यासह राजकीय पक्षाचे गटनेते कार्यालय खाली करण्याची लगबग दोन दिवसांपूर्वीच सुरू केली होती. मालमत्ता विभागाने महापालिकेची मुदत ४ एप्रिलला संपताच, सायंकाळी सर्व कार्यालय ताब्यात घेऊन लॉक केली.
उपमहापौर भगवान भालेराव व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्यासह पक्ष गटनेत्यांनी दाेन दिवसांपूर्वीच कार्यालयातील सामान हलविले. महापौर लीलाबाई अशान व विरोधी पक्षनेते राजेश वानखडे यांच्या कार्यालयातून ४ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत सामान हलविले हाेते. निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्यामुळे आता खासगी कार्यालये नागरिक व पक्ष कार्यकर्त्यांनी गजबजणार आहेत.