ठामपा आरक्षकांच्या भरतीवर महापौर नाराज
By admin | Published: May 31, 2017 05:46 AM2017-05-31T05:46:29+5:302017-05-31T05:46:29+5:30
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील आरक्षकांच्या भरतीवर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप घेतला आहे. महापालिका आस्थापनेवर झालेल्या आरक्षकांच्या नियुक्तीमध्ये ठाणे शहरातील केवळ दोन जणांचा समावेश आहे. यामुळे ठाण्यात सुशिक्षित मुले नाहीत का, असा संतप्त सवाल महापौरांनी केला आहे. ठामपातील विविध पदांच्या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देणे आवश्यक असून ही प्रक्रियाच संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ठामपाच्या आस्थापनेवर विविध पदांकरिता भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते. नुकतीच महापालिका आस्थापनेवर सुमारे ३२७ आरक्षकांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातून १८ जण त्यात असून शहरातील केवळ दोघांची नियुक्ती करून स्थानिकांना डावलल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. आरक्षक पदाच्या निवड यादीतील उमेदवारांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : सोलापूर (८), जळगाव (५०), अहमदनगर (३५), औरंगाबाद (१३), परभणी (१०), अकोला (२), नाशिक (२५), जालना (१५), नांदेड (२५), लातूर (९), पुणे (९), हिंगोली (७), ठाणे (१८), बीड (२३), रायगड (२), डोंबिवली (१), सिंधुदुर्ग (२), धुळे (७), सांगली (७), यवतमाळ (५), जिल्हा नमूद न केलेले उमेदवार (६), वाशीम (६), मुंबई (५) सातारा (२), नेरूळ (१), गोंदिया (१), नंदुरबार (११), बुलडाणा (९), रत्नागिरी (१), अमरावती (७), उस्मानाबाद (२), भंडारा (३) अशी एकूण ३२७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत अधिक बोलताना महापौर म्हणाल्या की, या नियुक्ती प्रक्रियेत कोणते निकष लावले, हे मला माहीत नाही. परंतु, ५० टक्के स्थानिक मुलांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. इतर मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते. परंतु, ही नियुक्ती पाहता बाहेरील राज्यांतील मुलांची संख्या अधिक आहे. या पदावर भरण्यात आलेल्या मुलांना नीट मराठी बोलता येत नाही. बाहेरील जिल्ह्यातील मनपामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जाते, मग इथल्या महापालिकेत का दिले नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, त्यांनी या भरतीसाठी झालेल्या आॅनलाइन परीक्षेच्या फी वरदेखील हरकत घेतली आहे. इतर महापालिका १५० रुपये फी आकारत असताना ठाणे महापालिकेने ८५० रुपये फी का आकारली? भरती प्रक्रियेचे आॅनलाइन काम हे खाजगी संस्थेकडे का दिले? ठाणे महापालिकेत तितके सक्षम अधिकारी, कर्मचारी नाहीत का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे. याबाबत, त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.