पुरस्कार सोहळ्यावर महापौरांचा बहिष्कार?, निवडीवरून नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:29 AM2017-10-05T01:29:56+5:302017-10-05T01:30:08+5:30
ठाणे महानगरपालिकेच्या पस्तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी गडकरी रंगायतन सभागृहात विविध क्षेत्रातील नामवंत ठाणेकरांना ‘ठाणेभूषण’, ‘ठाणेगौरव’ आणि ‘ठाणे गुणीजन’या पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पस्तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी गडकरी रंगायतन सभागृहात विविध क्षेत्रातील नामवंत ठाणेकरांना ‘ठाणेभूषण’, ‘ठाणेगौरव’ आणि ‘ठाणे गुणीजन’या पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. योगायोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस या वेळी हजर होत्या. मात्र, पुरस्काराच्या निवडीवरून नाराज असलेल्या शहराच्या प्रथम नागरिक महापौर मीनाक्षी शिंदे या सोहळ्याला अनुपस्थित होत्या.
एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाण्याला विकासाकडे नेण्याचे काम महापालिकेने केले आहे. त्यात ठाणेकर नागरिकांचाही मोलाचा वाटा आहे. परवा एल्फिन्स्टन रोडला झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे स्टेशनवरची वाढती गर्दी हा मुद्दा चर्चेत आला. त्यामुळे ठाणे आणि मुलुंडमध्ये नवीन स्टेशन उभे राहावे, यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रयत्नशील आहोत. ते स्टेशन लवकर होऊन लोकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच लवकरात लवकर मेट्रो आणण्याचा आमचा प्रयत्न असून ठाण्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी कायम सहकार्याचा हात पुढे केलेला आहे.
या वेळी ठाणे जिल्हा रुग्णालयात गेली ४० वर्षे शवविच्छेदनाचे काम करणाºया बनारसी चोटेले यांना ‘ठाणेभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर प्रकाश खांडगे, शांताराम धनावडे, राजश्री राम कणीकर, आसावरी फडणीस, संजय धबडगावकर, जय पाटील, नारायण गावंड, ओंकार मयेकर, श्रीपाद बोडस, डॉ. मानसी जोशी, लीला श्रोत्री, रामचंद्र राऊत यांना ‘ठाणेगौरव’ पुरस्काराने, तर शर्वरी जोशी, राजेश मढवी, संध्या नाकती, पोपटराव धोंगरे, प्रज्ञा कोळी, राजू बोटे, अतुल गुप्ते, विनय सामंत, निधी प्रभू, गजानन पवार, आरती नेमाणे, नागनाथ सोनावणे, बळीराम खरे, विनोद नाखवा, राजश्री तावरे, विकास थोरात, प्रकाश माळी, अमोल कदम, दीपक सोनावणे, आनंद कांबळे, शांता करला, राजेंद्र मुणनकर आदींचा ‘ठाणे गुणीजन’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाºया विद्यार्थ्यांना ठाणे विशेष पुरस्कार देऊन गौरवले.
पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वार्धात पु.ल. देशपांडे आणि आनंद दिघे यांच्या तैलचित्राचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ही चित्रे साकारणारे चित्रकार किशोर नांदिवडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सकाळच्या सत्रात महापालिकेच्या कर्मचाºयांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
पुरस्काराच्या मुद्यावरून दोनतीन दिवस नाराज असलेल्या महापौर मीनाक्षी शिंदे या सोहळ्याला अनुपस्थित होत्या. त्यांची तब्येत बरी नसल्याने त्या हॉस्पिटलला अॅडमिट असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले, तर आयुक्त संजीव जयस्वाल हे बाहेरगावी गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पुरस्काराच्या मुद्यावरूनच महापौर नाराज असल्याने गैरहजर राहिल्याची कुजबुज सभागृहात उपस्थित मान्यवरांमध्ये सुरू होती.
अखेर त्या ९३ वर्षीय शिक्षिकेला ठाणे गौरव पुरस्कार
ठाणे : वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेकडून अनेकांना गुणीजन पुरस्काराची खिरापत वाटली जाते. यंदादेखील तसाच काही प्रकार घडला होता. या पुरस्कारात संस्कृत विषयात पारंगत असलेल्या एका ९३ वर्षीय शिक्षिकेचाही समावेश केल्याने तो वादाचा मुद्दा झाला होता. तसेच, यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच, महापौरांनी यात मध्यस्थी करून या गुणी शिक्षिकेला बुधवारी ठाणे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा पुन्हा पालिकेकडून दिल्या जाणाºया पुरस्काराच्या मुद्यावरून या वर्धापन दिनात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे होती. महापौर कार्यालयाकडे पुरस्कारासाठी लेखी शिफारशींचा खच पडला होता. यामध्ये नगरसेवकांनी शिफारस केलेल्या इच्छुकांची संख्या अधिक होती. तसेच नको त्यांना आणि नातेवाइकांनाच पुरस्कार देण्यासाठी नगरसेवकांनी फिल्डिंग लावल्याचेही दिसले. यामध्ये गुणीजन पुरस्कार हा अतिशय वादग्रस्त ठरलेला मुद्दा होता. याच पुरस्कारात ठाण्यातील लीला श्रोत्री यांना ठाणेभूषण अथवा गौरव या पुरस्काराने सन्मानित करावे, म्हणून सेनेच्या नगरसेवकाने शिफारसपत्र दिले होते. विशेष म्हणजे यामध्ये श्रोत्री यांनी केलेले संपूर्ण कार्यदेखील त्यांनी विशद केले होते. त्या शिक्षिका असून वयाच्या ९३ व्या वर्षीदेखील बाह्यपरीक्षांची भूमिका बजावत आहेत.