मनोरमानगर रस्ता रुंदीकरणाला महापौरांचा ब्रेक
By admin | Published: April 18, 2017 03:20 AM2017-04-18T03:20:39+5:302017-04-18T03:20:39+5:30
ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा मिसिंग लिंक विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ढोकाळी, मनोरमानगर भागातील रस्त्याचे रुंदीकरण
ठाणे : ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा मिसिंग लिंक विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, ढोकाळी, मनोरमानगर भागातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. यात रेंटलच्या घरांमध्ये येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा पालिकेचा विचार आहे. परंतु, रहिवाशांचे बीएसयूपी म्हणजेच हक्काच्या घरात पुनर्वसन करा. नंतरच, रस्ता रुंदीकरण करा, अशी भूमिका महापौरांनी घेतल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रुंदीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागला आहे.
काही महिन्यांपासून पालिका आयुक्तांनी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, निवडणुकीच्या काळात या कामाला ब्रेक लागल्यानंतर पुन्हा एकदा या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, मखमली, समतानगर आदी भागांत ही मोहीम पार पाडल्यानंतर आयुक्तांनी आपला मोर्चा ढोकाळी भागातील मनोरमानगर येथील एव्हरेस्ट येथून आर मॉलपर्यंत येणाऱ्या रस्त्यातील अशोकनगर, निर्मल आनंदनगरकडे वळवला. परंतु, यात जवळजवळ २१० रहिवासी बाधित होत असल्याने या रस्त्याला थेट महापौरांनीच विरोध केला आहे. प्रशासनाने बाधित लोकांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या काळात ही कारवाई थंडावली होती. परंतु, या लोकांना भाड्याच्या घरात नव्याने प्रवेश देण्याऐवजी बीएसयूपीसारख्या योजनेत स्थान द्यावे, अशी मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. मुळात रेंटल हाऊसिंगमधील घरांबाबत अनेक तक्रारी असल्याने शहरासाठी नागरिक आपली घरे देत असताना या रहिवाशांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे सांगून याप्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच ज्या रस्त्याला डेड एंड आहे, तो करण्याचा अट्टहास का, असा प्रश्न केला आहे. तसेच विकास करताना रहिवाशांना पर्यायी व्यवस्था देताना ती व्यवस्थाही तेवढीच सक्षम असणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महापौरांच्या या भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला एक पाऊल मागे घ्यावे लागले असून तूर्तास या रस्त्याचे रुंदीकरण थांबले आहे. आता पुढील आठवड्यात पालकमंत्री, महापौर आणि आयुक्त यांची एकत्रित चर्चा होऊन या रस्त्याचा प्रश्न निकाली काढला जाणार आहे. (प्रतिनिधी)