महापौर, शिवसेनेच्या पदाधिका-यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:41 AM2017-12-09T01:41:19+5:302017-12-09T01:41:33+5:30
सन २०१३ मधील एका प्रकरणात शांतताभंग आणि जमावबंदी आदेशप्रकरणी बजावलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना पदाधिकारी विजय साळवी
कल्याण : सन २०१३ मधील एका प्रकरणात शांतताभंग आणि जमावबंदी आदेशप्रकरणी बजावलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना पदाधिकारी विजय साळवी, सुनील वायले, रवी पाटील या तिघा पदाधिकाºयांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
२०१३ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही पोस्ट टाकणारा तरुण हा कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात राहणारा होता. ही माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांनी त्याच्या घराच्या दिशेने कूच केले होते. त्या वेळी तणावाचे वातावरण पसरले होते. या प्रकरणात तत्कालीन नगरसेवक देवळेकर, तत्कालीन शहरप्रमुख विजय साळवी, नगरसेवक सुनील वायले आणि रवी पाटील या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, महात्मा फुले चौक पोलिसांनी या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. साळवी यांनी पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. महापौर देवळेकरांनी आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले.