उल्हासनगर महापौर निवडणूक : पक्षांचे बहुतांश नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 04:36 AM2018-09-26T04:36:00+5:302018-09-26T04:36:16+5:30

महापौर निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी भाजपा आणि शिवसेना समर्थक नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

Mayor Election of Ulhasnagar | उल्हासनगर महापौर निवडणूक : पक्षांचे बहुतांश नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

उल्हासनगर महापौर निवडणूक : पक्षांचे बहुतांश नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापौर निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी भाजपा आणि शिवसेना समर्थक नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ््यासमोर ठेवून स्वत:चे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकले आहेत. शिवसेना समर्थक भारिप आणि काँग्रेसचे दोन्ही नगरसेवक भाजपाच्या तंबूत दाखल झाल्याने, शिवसेनेची चिंता वाढली आहे.
उल्हासनगर महापालिकेची सत्ता ओमी टिम आणि साई पक्षाच्या मदतीने भाजपाने काबिज केली. मात्र, आयलानी व कालानी यांच्यात केलेल्या महापौरपदाच्या विभागणीमुळे सत्ता गमावण्याची वेळ आली होती. महापौर पदाला सव्वा वर्ष होताच ओमी टिमच्या मागणीनुसार मीना आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. मात्र, आयलानी यांच्या राजीनाम्यामुळे भाजपा व साई पक्षातील एक गट नाराज झाला. साई पक्षात उभी फूट पडून, फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांनी सेनेच्या मदतीने अर्ज दाखल केला. भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले असून, त्यांनी ज्योती भटिजा यांना महापौरपदी निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे.
साई पक्षाच्या फुटीचा परिणाम भाजपावर झाला असून बहुमत मिळवण्यासाठी पळापळ सुरू आहे. बहुमतासाठी ७७ नगरसेवकांपैकी ३९ नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपाचे ३१, साई पक्षाचे ५, काँग्रेस आणि भारिपचे प्रत्येकी १ व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक सतरामदास जेसवानी असे एकूण ३९ नगरसेवक भाजपा-ओमी टिम व साई पक्षाच्या आघाडीकडे आहेत. त्यापैकी काँग्रेसच्या अंजली साळवे आणि भारिपच्या कविता बागुल गेल्या वेळी शिवसेनेसोबत होत्या. भारिप व काँग्रेस हे कट्टर भाजपाविरोधी पक्ष असताना, त्या भाजपाच्या गोटात गेल्याच कशा, असा प्रश्न पक्ष कार्यकर्त्यांपुढे उभा ठाकला आहे. शिवसेनेचे २५, साई पक्षाच्या फुटीर गटाचे ७, रिपाइं-पीआरपी गटाचे ३ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ पैकी ३ असे एकूण ३८ नगरसेवक शिवसेनेकडे आहेत.

बंडखोर नगरसेवकांच्या भूमिकेवर सर्वांची नजर
भाजपाच्या डेऱ्यात दाखल झालेल्या काँगे्रस, भारिप व राकाँचे बंडखोर नगरसेवक सतरामदास जेसवानी यांची भूमिका महत्त्वाची राहील. राकाँचे गटनेते भरत गंगोत्री यांनी व्हीप जारी करून, भटिजा यांना मतदान करण्यास बजावले आहे. बंडखोर नगरसेवक जेसवानी यांनी तटस्थ अथवा विरोधी मतदान केले, तरी कारवाईचे संकेत गंगोत्री यांनी दिले. काँगे्रसच्या अंजली साळवे आणि भारिपच्या कविता बागुल यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून दबाव आणण्याचे काम शिवसेना करीत आहे.

भाजपा नगरसेवकाच्या सदस्यत्त्वावर गदा?
भाजपाच्या नगरसेविका पूजा भोेईर यांचे सदस्यत्त्व रद्द झाल्याने, एकूण नगरसेवकांची संख्या ७८ वरून ७७ झाली. सोनु छापु यांचेही सदस्यत्त्व जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. मात्र याविरोधात छापु न्यायालयात गेले असून, महापौर निवडणुकीपूर्वी त्यांच्या सदस्यत्त्वाचा निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे. तसे झाल्यास शिवसेनेला त्यांचा फायदा होणार आहे.

गोवा आणि पालघरात नगरसेवकांचा मुक्काम
भाजपा-ओमी टिम, साई तसेच काँगे्रस व भारिपचे नगरसेवक गोव्याला तर शिवसेना, रिपाइं-पीआरपी, साई फुटीर गटाचे समर्थक नगरसेवक पालघर येथील फार्महाऊसमध्ये मुक्कामी आहेत. निवडणुकीच्या दिवशी त्यांना महासभेत आणण्यात येणार आहे. काँग्रेस आणि भारिपच्या श्रेष्ठींनी दखल घेतली, तर सेनेच्या मदतीने फुटीर साई पक्ष बाजी मारू शकतो.

Web Title: Mayor Election of Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.