नारायण राणेंविरुद्ध महापौरांनी केला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:44 AM2021-08-25T04:44:56+5:302021-08-25T04:44:56+5:30
ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल ...
ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यापूर्वी म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोरच घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
राणे यांच्या वक्तव्यामुळे पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये ठाणे शहरात संघर्ष निर्माण होऊ शकतो. राणे यांच्या वक्तव्यामुळे राजशिष्टाचाराचाही अपमान झाल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०५ (२) आणि १५३- ब नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
* काय सांगते कलम ५००- एखाद्याची बदनामी करणे.
* कलम ५०५ (२)- वर्गावर्गात द्वेषभाव किंवा दुष्टावा निर्माण किंवा वाढविणारे विधाने करणे
* कलम- १५३- बेछूटपणे, चिथावणीखोर वक्तव्य करून दंगलीचा अपराध घडावा, असा उद्देश. यात एक वर्ष कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
२-शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना निर्माण करणारे वक्तव्य करणे
* या कलमांद्वारे तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------
मंत्रिपदाचे गाजर दाखवून भाजपने शिवसेनेवर भुंकणारा प्राणी पाळलेला आहे, अशा शब्दात नाव न घेता राणे यांच्यावर महापौर म्हस्के यांनी निशाणा साधला आहे. यावेळी शहरप्रमुख हेमंत पवार, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
.........................