महापौर मॅरेथॉन खेतरामने जिंकली
By admin | Published: November 23, 2015 01:07 AM2015-11-23T01:07:32+5:302015-11-23T01:07:32+5:30
पुण्याच्या स्वाती गाढवे हिने सुरुवातीच्या काही किलोमीटरपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवताना पाचव्या वसई - विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत महिलांच्या अर्धमॅरेथॉनचे
रोहित नाईक, विरार
पुण्याच्या स्वाती गाढवे हिने सुरुवातीच्या काही किलोमीटरपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवताना पाचव्या वसई - विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत महिलांच्या अर्धमॅरेथॉनचे दिमाखदार विजेतेपद पटकावले. त्याचवेळी मानसिंग आणि खेता राम या अनुभवी व कसलेल्या धावपटूंनी अनुक्रमे पुरुषांच्या अर्धमॅरेथॉन आणि पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी मारली.
वसई - विरार महापालिकेच्या वतीने झालेल्या या सर्वाधिक बक्षिस रक्कमेच्या राष्ट्रीय मॅरेथॉनचे यंदाचे पाचवे वर्ष होते. विरार येथील न्यू विवा कॉलेज येथून सकाळी ६ वाजता पूर्ण मॅरेथॉनला सुरुवात झाली. तर वसई येथील पंचायत समिती येथून सकाळी ६.३० वाजता पुरुष व महिला अर्धमॅरेथॉनला सुरुवात झाली.
महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या धावपटूंचे वर्चस्व राहिले. तर पुरुषांमध्ये बलाढ्य आर्मीने आपला दबदबा कायम राखला. महिलांची अर्धमॅरेथॉन सुरुवातीच्या १० किमी पर्यंत चुरशीची झाल्यानंतर एकतर्फी झाली. सुरुवातीला स्वाती, रोहिणी राऊत आणि मोनिका आथरे या तिन्ही अव्वल धावपटू एकत्रित होत्या. मात्र १२ किमी नंतर स्वातीने एकाकी आघाडी घेत आपला वेग वाढवला. यानंतर तीने रोहिणी व मोनिका यांना खूप मागे टाकले. अखेरपर्यंत स्वातीने आपली आघाडी कायम राखताना बाजी मारली. दरम्यान अखेरच्या काही मीटरमध्ये रोहिणीने स्वातीला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र तीला यश न आल्याने द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.
स्वातीने १ तास १८ मिनिटे ३५ सेकंदाची वेळ देत सहज बाजी मारली. तर रोहिणी (१:१९:२४) आणि मोनिका (१:२०:३६) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. स्वातीने याआधी २०१२ साली या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेताना चौथे स्थान पटकावले होते. यावेळी मात्र तीने सगळी कसर भरताना जेतेपदाला गवसणी घातली. त्याचवेळी सलग पाचव्यांदा वसई - विरार मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या मोनिकाला पुन्हा अव्वल स्थान पटकवण्यात अपयश आले. याआधी तीला द्वितीय व तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले होते.
पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये आर्मीच्या धावपटूंनी एकहाती वर्चस्व राखले. मूळचा उत्तराखंडचा असलेल्या आणि आर्मी स्पोटर््स इन्स्टीट्यूट पुणेचा धावपटू मानसिंग याने अंतिम क्षणी वेग वाढवून बाजी मारली. शर्यतीच्या सुरुवातीपासूनच मानसिंग श्रीनू बुगाथा आणि बल्लीअप्पा एबी या कसलेल्या धावपटूंसह एकत्र होता. अखेरचे ५ किमी अंतर बाकी असताना त्याने आपला वेग वाढवून आघाडी कायम राखली. मानसिंगने १ तास ६ मिनिटे ३७ सेकंदाची वेळ देत विजेतेपद निश्चित केले.
मानसिंगने घेतलेल्या मोठ्या आघाडीनंतर श्रीनू आणि बल्लीअप्पा यांच्यामध्ये चुरस लागली. यामध्ये श्रीनूने १ तास ६ मिनिटे ५४ सेकंदाची वेळ देत दुसरे स्थान पटकावले. तर बल्लीअप्पाला १ तास ७ मिनिटे ३ सेकंदाच्या वेळेसह तृतीय स्थानी समाधान मानावे लागले. एक दिवस अगोदर पावसाचा शिडकावा झाल्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर झाला. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये अनुभवी खेता राम याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना २ तास २२ मिनिटे ३२ सेकंदाची विक्रमी वेळ देत विजेतेपद पटकावले. या कामगिरीसह त्याने वसई - विरार मॅरेथॉनमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे अर्धमॅरेथॉनसाठी ओळखला जाणाऱ्या खेत रामने या मॅरेथॉनद्वारे पूर्ण मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच शर्यतीत विक्रमी विजेतेपद पटकावताना आगामी मुंबई मॅरेथॉनसाठी स्वत:ला सज्ज केले आहे. दुसऱ्या बाजूला चंद्र प्रकाश (२:२४:३२) आणि गिरिश तिवारी (२:२८:०१) यांना खेत रामच्या धडाक्यापुढे अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी समाधान मानावे लागले.
याआधी मी केवळ अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचो. वसई - विरारच्या माध्यमातून पूर्ण मॅरेथॉनमध्ये प्रथमच स्वत:ला आजमावले. आगामी मुंबई मॅरेथॉन माझे मुख्य लक्ष्य असून या विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई मॅरेथॉनद्वारे आॅलिम्पिक पात्रता करण्याची संधी असून २ तास १७ मिनिटांमध्ये मला शर्यत पूर्ण करावी लागेल. वसई - विरार मॅरेथॉनमधून मला माझी तयारी कळाली आणि त्यानुसार मी जोमाने तयारीला लागणार आहे. - खेतराम ( मॅरेथॉन, विजेता)