महापौर-आमदार मेहतांमध्ये वादाची ठिणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:32 AM2017-07-21T03:32:58+5:302017-07-21T03:32:58+5:30
मीरा- भार्इंदरच्या महापौर गीता जैन यांना डावलण्याचे प्रकार भाजपातच सुरु झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा महापौर - आमदार यांच्या वादाची चर्चा उफाळून
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा- भार्इंदरच्या महापौर गीता जैन यांना डावलण्याचे प्रकार भाजपातच सुरु झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा महापौर - आमदार यांच्या वादाची चर्चा उफाळून आली आहे. भाजपाच्या वतीने झालेल्या एका कार्यक्रमपत्रिकेत महापौरांना डालवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
आमदार नरेंद्र मेहता व महापौर जैन यांच्यातील मतभेदाची चर्चा नवीन नाही. महापौरांनी ज्या पोरवाल बिल्डरविरुध्द तक्रारी करत कारवाईची मागणी केली त्याच दिलीप पोरवाल व मुलगा गौरव यांना जवळ करुन मेहतांनी महापौरांना धक्का दिला. गौरवला तर थेट प्रदेशस्तरावर पद दिले आहे.
महापालिका वा पक्ष स्तरावरच्या अनेक विषयात महापौरांना बाजूला ठेवण्यात येत असल्याची चर्चा होतीच. शिवाय प्रशासनालाही महापौरांचे ऐकू नका अशा स्वरुपाची तंबी दिल्याचा मुद्दा कळीचा ठरला होता. भाजपाच्या पालिका कामगार संघटनेच्या स्थापनेवेळीही महापौरांचा मान न राखला गेल्याने त्यांनी स्वत: पदाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली.
भाजपाच्या वा भार्इंदर पश्चिममधील काही बैठकांना जैन यांना बोलावलेच जात नव्हते. पालिका निवडणुकीसाठीही मतदारयादीतील घोळ व शेजारच्या प्रभागातील मतदारांची नावे त्यांच्या प्रभागात टाकण्यात आल्याने जैन यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. महापौरांनी केलेल्या तक्रारीवरूनही नेतृत्वाने नाराजीचाच पवित्रा घेतला.
अगदी उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने बुधवरी झालेल्या कार्यक्रमात महापौरांचा अवमान करण्यात आला. बेकायदा बांधकामप्रकरणी वादग्रस्त असलेले पण विविध शाळा, महाविद्यालयांचे संस्थापक असलेल्या लल्लन तिवारी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रवेश व जाहीर कार्यक्रम करायचे ठरवण्यात आले. त्यासाठी निमंत्रण पत्रिकहीा छापण्यात आल्या. परंतु या निमंत्रण पत्रिकेत महापौरांचा उल्लेखच केला नसल्याने संताप व्यक्त होऊ लागला.
जाणूनबुजून महापौरांना डावलण्याचा व अपमान करण्याचा हा खटाटोप असल्याचा आरोप मेहता विरोधकांनी सुरु केला आहे. डालवण्यामागे भाजपा आमदाराचा हात असल्याचा आरोप महापौरांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
मुद्दाम अपमान करण्याचा प्रयत्न
अनेक बैठकांनाही महापौरांना निमंत्रण दिले जात नाही. डावलले जाऊन मुद्दाम अपमान करण्याचा हा प्रकार उत्तर भारतीयांच्या मोर्चाच्या माध्यमातून केला जात असला तरी त्याचा काहीही उपायोग होणार नाही, असे महापौरांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.