बॉलिवूड पार्कचे काम थांबविण्याचे महापौरांचे आदेश; महासभेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:26 AM2019-11-21T00:26:13+5:302019-11-21T00:26:20+5:30
झालेल्या खर्चाची वसुली ठेकेदाराकडून करावी
ठाणे : थीम पार्कपाठोपाठ लोकमान्यनगर भागातील बॉलिवूड पार्कचे कामही थांबवण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय, आतापर्यंत ठेकेदाराला दिलेली रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले आहे. बॉलिवूड पार्कऐवजी या ठिकाणी पूर्वीसारखे उद्यान पुन्हा विकसित करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महानगरपालिकेच्या मंगळवारच्या महासभेत थीम पार्कबरोबरच बॉलिवूड पार्कच्या चौकशीचे काय झाले, असा सवाल भाजपच्या नगरसेविक मृणाल पेंडसे यांनी केला. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे साहित्य आले नसूनही ठेकेदाराला बिल अदा केल्याचा मुद्दा नगरसेविका आशा डोंगरे यांनी उपस्थित केला. या कामामुळे येथे गर्दुल्ले आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा दशरथ पालांडे यांनी उपस्थित केला. परंतु, ठेकेदाराला आतापर्यंत किती बिल अदा करण्यात आले, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करायची गरजच काय, यात भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट दिसत असताना ठेकेदारावर मेहरनजर कशासाठी, असा सवाल इतर नगरसेवकांनीही केला. त्यावर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिराव यांनी या बॉलिवूड पार्कच्या कामाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, जोपर्यंत याठिकाणी सर्व साहित्य येत नाही, तोपर्यंत झालेल्या कामाचे मोजमाप करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.
आतापर्यंत ठेकेदाराला झालेल्या कामाच्या बदल्यात सहा कोटी ८८ लाखांचे बिल अदा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. परंतु, त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने लोकप्रतिनिधी आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले.
भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी संबंधित ठेकेदाराला २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती, त्या मुदतीत त्याने काम पूर्ण केले नसल्याने आहे ते काम बंद करण्यात यावे, झालेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने या कामाची चौकशी करून त्या कामाचे पैसे वसूल करण्यात यावेत, अशी मागणी लावून धरली. अखेर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कामाची चौकशी करण्याऐवजी ते काम बंद करण्यात यावे, देण्यात आलेल्या बिलाची वसुली करण्यात यावी आणि पूर्वी होते, तसे उद्यान विकसित करण्यात यावे, असे आदेश दिले.