महापौरपद निवडणूक : शिवसेना, भाजपा दाव्यांवर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:32 AM2018-05-05T06:32:55+5:302018-05-05T06:32:55+5:30
केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा हे महापौरपदाच्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. उद्या (शनिवारी) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत.
कल्याण - केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा हे महापौरपदाच्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. उद्या (शनिवारी) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार अर्ज भरले जातील, असे संकेत दोन्ही पक्षांकडून दिले जात आहेत. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीवरून युतीमध्येच सामना होतो की, तडजोड होऊन बिनविरोध निवड होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महापौरपदाची निवडणूक ९ मे रोजी होणार आहे. त्यासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. उल्हासनगरमधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर कल्याणचे महापौरपद शिवसेना आपल्याकडेच ठेवेल, असे संकेत मिळत असताना दुसरीकडे भाजपाने महापौर आमचाच, असे प्रत्युत्तर शिवसेनेला नुकतेच दिले आहे. पक्षाच्या बुधवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आगामी महापौर भाजपाचाच असेल, असे पत्रकच जारी करण्यात आले.
शिवसेना ५३, भाजपा ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे पक्षीय बलाबल केडीएमसीमध्ये आहे. शिवसेनेला अपक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ ५७ आहे. आमचे संख्याबळ अधिक असल्याने आमचाच महापौर यंदाही होईल, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. सत्ता स्थापनेनंतर पहिली अडीच वर्षे महापौरपदाचा मान शिवसेनेला मिळाला आहे. तर, उर्वरित अडीच वर्षांमध्ये युतीमधील भाजपाला एक वर्ष आणि दीड वर्ष शिवसेनेला, असा युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. परंतु, उल्हासनगरमधील सत्तांतराच्या वातावरणात कल्याणचे महापौरपद पुन्हा आपल्याकडेच राखण्याचे मनसुबे स्थानिक पातळीवर रचले जात आहेत. त्याप्रमाणे कृती सुरू केली आहे. शिवसेनेकडून भारती मोरे, विनीता राणे, वैशाली भोईर, रेखा म्हात्रे, माधुरी काळे, वीणा जाधव यांची नावे, तर भाजपा पक्षातील खुशबू चौधरी, मनीषा धात्रक, डॉ. सुनीता पाटील, उपेक्षा भोईर, प्रमिला चौधरी यांची नावे महापौरपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. उद्या शनिवारी सकाळी महापालिकेच्या कार्यालयीन वेळेत सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे कोण उमेदवारी दाखल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निष्ठावंतांना संधी द्या
पक्षात बाहेरून आलेल्यांना आतापर्यंत विविध पदांची खिरापत वाटण्यात आली आहे. पण, महापौरपदाचा उमेदवार ठरवताना निष्ठावंतांचा विचार करावा, असा सूर शिवसेनेत उमटू लागला आहे. भाजपामध्येही हे वातावरण आहे. महिला खुल्या गटासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदाचा उमेदवार कोण, याबाबत दोन्ही पक्षांनी कमालीची गुप्तता बाळगली आहे.
पालकमंत्री शब्द पाळतील, भाजपाला विश्वास
युतीमधील वाटाघाटीनुसार, पहिली अडीच वर्षे शिवसेनेला पुढील एक वर्ष भाजपाला व दीड वर्ष शिवसेनेला, तर स्थायी समिती सभापतीपद दोन वर्षे भाजपा व दोन वर्षे शिवसेना असे ठरले असल्याकडे भाजपाने लक्ष वेधले आहे. महापौरपदाबाबत दिलेला शब्द पालकमंत्री नक्कीच पाळतील, असा विश्वास भाजपाला आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे जास्त नगरसेवक असल्याने शिवसेनेचाच महापौर होईल. शनिवारी शिवसेनेचा उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. भाजपा युतीमधील मित्रपक्ष असल्याने आम्हाला महापौरपदासाठी सहकार्य करेल, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.