मालमत्ता थकबाकीदारांच्या यादीत चक्क महापौरही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:23 AM2018-05-31T00:23:53+5:302018-05-31T00:23:53+5:30
उल्हासनगर महापालिकेने मालमत्ताकरवसुली करण्यासाठी तब्बल चार वेळा अभय योजना राबवून व्याज माफ केले. अनेकवेळा नोटिसा बजावल्या
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेने मालमत्ताकरवसुली करण्यासाठी तब्बल चार वेळा अभय योजना राबवून व्याज माफ केले. अनेकवेळा नोटिसा बजावल्या, तरीही करवसुलीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. महापौर मीना आयलानी यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून मालमत्ताकर भरण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मात्र, स्वत: महापौर आणि त्यांच्या मुलाकडेच हजारो रु पयांची थकबाकी असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
शहरात व्यावसायिक आणि घरगुती मालमत्ताकर बुडवणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. मालमत्ताजप्तीच्या नोटिसा बजावल्या. काहीवेळा जप्तीची कारवाईही झाली. एवढेच नव्हे तर सरकारची अभय योजना तब्बल चारवेळा राबवली, मात्र तरीही नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. महापौर आयलानी या स्वत:च वेळेवर कर भरत नसल्याची बाब समोर आली आहे. महापौर यांचे पुत्र धीरज यांच्याकडेही अनेक वर्षांची थकबाकी आहे. आयलानी यांचे सचदेव कॉम्प्लेक्स या इमारतीत पहिल्या मजल्यावर चॉइस कलेक्शन हे दुकान आहे. या मालमत्तेला व्यावसायिककर लागू असून दोन वर्षांपासून ३१५८९ रु पये थकबाकी आहे, तर मुलगा धीरज याचेही याच इमारतीत दुकान आहे. या दुकानाची ५७३१७ रुपये थकबाकी आहे.
मागील तीन वर्षांपासून धीरजने मालमत्ताकर भरलेला नसल्याचे उघडकीस आले आहे. कर बुडवणाºयांच्या यादीत राजकीय नेत्यांनी भलीमोठी यादी आहे. यात उपमहापौर जीवन इदनानी यांच्या मालमत्तेवरही काही महिन्यांपूर्वी कारवाई झाली होती. आता या यादीत महापौरांचे नावही सामील झाल्याने या पदाचा अवमान झाल्याची प्रतिक्रि या शहरात व्यक्त केली जात आहे.