विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरुन सेनेकडून महापौरांची पुन्हा कोंडी; दालनात सेना नगरसेवकांचा ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 05:05 PM2017-11-22T17:05:36+5:302017-11-22T17:06:12+5:30
विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा ठोस निर्णय जोपर्यंत महापौर डिंपल मेहता यांच्याकडून जाहीर केला जात नाही, तोपर्यंत महापौरांच्या दालनातच सेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले.
भाईंदर - विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा ठोस निर्णय जोपर्यंत महापौर डिंपल मेहता यांच्याकडून जाहीर केला जात नाही, तोपर्यंत महापौरांच्या दालनातच सेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले. महापौरांनी मात्र सेनेच्या आंदोलनाची पुरेशी दखल न घेता सरकारच्या अभिप्रायानंतरच योग्य निर्णय घेण्यावर शेवटपर्यंत ठाम राहिल्या.
विरोधी पक्ष नेता पदावर सेनेचे नगरसेवक राजू भोईर यांची त्वरीत नियुक्ती व्हावी, यासाठी महापौरांनी अधिकृत घोषणा करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या सेनेच्या सहनशक्तीचा बांध मंगळवारपासून तुटला. मंगळवारी सेनेच्या नगरसेवकांसह पदाधिका-यांनी महापौरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या दालनाचा ताबा घेत त्या पदावर भोईर यांची प्रतिकात्मक नियुक्ती झाल्याचे सेनेकडूनच जाहीर करण्यात आले. मात्र तशी अधिकृत घोषणा महापौरांकडूनच व्हावी, अशी अपेक्षा देखील सेनेला लागून राहिल्याने जोपर्यंत महापौर अधिकृतपणे जाहीर करीत नाही. तोपर्यंत महापौर दालनातच विरोधी पक्ष नेत्याचा कारभार सुरु करण्याचा इशारा सेनेकडून देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी पुन्हा सेनेचे काही नगरसेवक व पदाधिका-यांनी महापौर दालनात आले. त्यांनी दालनाबाहेर ठिय्या मांडला. त्यावेळी भार्इंदर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी मध्यस्थी केल्याने महापौरांनी सेनेच्या नगरसेवकांना चर्चेसाठी आमंत्रित केले. सुमारे तासभर चाललेल्या चर्चेअंती दालनाबोहर पडलेल्या सेनेच्या नगरसेवकांनी, महापौर येत्या आठ दिवसांत सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावून त्यात जो निर्णय होईल त्याप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे उपस्थित पत्रकारांना सांगितले. यानंतर पत्रकारांनी महापौरांना त्याची विचारणा केली असता तसे कोणतेही आश्वासन आपण सेनेला दिले नसल्याचा खुलासा त्यांनी केला. परंतु, चर्चेत सहभागी झालेले भाजपा नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांनी तशी सूचना मांडली होती, असे महापौरांकडुन स्पष्ट करण्यात आले. त्याची माहिती सेनेच्या नगरसेवकांना मिळताच त्यांनी पुन्हा महापौरांकडे मोर्चा वळविला. त्यांनी त्याचा जाब महापौरांना विचारला असता पुन्हा महापौरांनी पत्रकारांना पाचारण करुन केवळ गटनेत्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल, तो जाहीर केला जाईल, असे वरवरचे उत्तर पुन्हा दिल्याने सेनेच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यांनी आपापले मोबईल बंद करुन पुन्हा महापौरांसोबत अॅण्टी चेंबरमध्ये चर्चेला सुरुवात केली. दरम्यान, घडलेल्या घटनाक्रमाची माहिती गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांनी शहर संपर्क प्रमुख आ. प्रताप सरनाईक यांना दिली. त्यांनी महापौरांकडुन तसे लेखी पत्राची मागणी करण्याचे निर्देश आमगावकर यांना दिले. त्यामुळे त्या पदावरील ठोस निर्णयाचे लेखी उत्तर जोपर्यंत महापौर देत नाहीत, तोपर्यंत सेनेच्या नगरसेवकांनी त्यांच्या दालनातच ठाण मांडण्याचा पावित्रा घेतला. यावेळी मात्र सेनेच्या अनेक नगरसेवकांनी दांडी मारल्याचे दिसून आले. तर सहभाग घेतलेल्यांमध्ये उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, नगरसेवक दिनेश नलावडे, राजू भोईर, अनंत शिर्के, नगरसेविका अनिता पाटील, तारा घरत, भावना भोईर, शहरप्रमुख प्रकाश मांजरेकर, उपशहरप्रमुख लक्ष्मण जंगम आदींचा समावेश होता. सेनेच्या या आंदोलनामुळे पालिका मुख्यालयात स्थानिक पोलिसांसह शीघ्र कृती दलाचा बंदोबस्त महापौर दालनाबाहेर तैनात करण्यात आला होता.