महापौरांनी घेतला कोविड आरोग्य यंत्रेणचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:15 AM2021-02-21T05:15:39+5:302021-02-21T05:15:39+5:30
ठाणे : कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असून, या पार्श्वभूमीवर शनिवारी महापौर नरेश म्हस्के आणि विधान परिषदेतील शिवसेना आमदार रवींद्र ...
ठाणे : कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असून, या पार्श्वभूमीवर शनिवारी महापौर नरेश म्हस्के आणि विधान परिषदेतील शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी ठाणे ग्लोबल सेंटर येथील कोविड आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच ठाणे शहरात वाढत असलेली कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या.
कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा अचानक वाढ होऊ लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून सर्वच महापालिकांना देण्यात आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी उपायुक्त विश्वनाथ केळकर, डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांच्याशी चर्चा करून रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यापूर्वी कोरोना काळात ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयातील सर्व डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी नर्स आणि संपूर्ण यंत्रणेने ज्यापद्धतीने काम केले याबद्दल महापौरांनी संपूर्ण यंत्रणेचे कौतुक केले. तसेच येणारे आव्हान पुन्हा नवे असून, ते पेलण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी याबाबतच्या सूचना करून संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली.
* महापौर, आमदारांनी केले लसीकरण
महापौर म्हस्के व आमदार फाटक यांनी स्वतः कोरोना लसीचे लसीकरण करून घेतले. ही लस पूर्णतः सुरक्षित असून, याबाबत गैरसमज पसरविण्यात आले आहेत. त्यावर अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन महापौरांनी केले. शासनाच्या सूचनांनुसार सर्व फ्रन्टलाइन कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांनी आपल्या नावाची नोंदणी करून लसीकरण करून घ्यावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.