महापौरांना दाऊदच्या हस्तकाची धमकी, ठाणे महापालिकेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:57 AM2019-09-19T00:57:54+5:302019-09-19T06:52:53+5:30

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना धमकी देण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे.

Mayor threatens Dawood's handiwork | महापौरांना दाऊदच्या हस्तकाची धमकी, ठाणे महापालिकेत खळबळ

महापौरांना दाऊदच्या हस्तकाची धमकी, ठाणे महापालिकेत खळबळ

Next

ठाणे : ‘तुम्ही नीट राहिला नाही तर तुम्हाला उचलून नेऊ आणि तुमच्या कुटुंबीयांना त्रास देऊ, तुम्ही हिशोबात रहायचे’ अशा शब्दांत ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना धमकी देण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने त्याच्या डोंगरीतील हस्तकाने ही धमकी दिल्याचा दावा महापौर शिंदे यांनी पोलिसांकडे केला आहे. याप्रकरणाने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कापूरबावडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. यापूर्वी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरुन दाऊदच्या धमक्या आल्याचे प्रकरण काही वर्षांपूर्वी गाजले होते. आता ठाणे महापालिकेचे नावही दाऊदशी जोडले गेले आहे.
महापौर शिंदे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या मोबाइलवर १७ सप्टेंबर रोजी रात्री ११.१६ ते ११.५० वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने डोंगरीवरुन फोन केला. आपण दाऊदचा माणूस बोलत असल्याचा दावा त्याने केला. सुरुवातीला धमकी देणाऱ्याने ‘तुम्ही मीनाक्षी शिंदे बोलता का? अशी विचारणा केली. त्यावर महापौरांनी होकारार्थी उत्तर देत काय काम आहे? असेही विचारले. तेंव्हा त्याने दाऊदच्या नावाने त्यांना धमकावले. तुम्ही ठाण्यात खूप भांडणे करता, व्यवस्थित रहात नाही. नीट राहिला नाही तर तुम्हाला उचलून नेऊ, अशी धमकी त्याने दिली. या धमकीमुळे प्रचंड धास्तावलेल्या महापौरांनी तातडीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अलीकडेच महापौर विरुद्ध प्रशासन असा वाद चांगलाच पेटला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत महापौरांचेही नाव उमेदवार म्हणून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर थेट दाऊद किंवा छोटा शकील यांच्या नावाने महापौरांना कोण धमकी देऊ शकते? असे तर्कवितर्क केले जात आहेत.
मुंबई महापालिकेनी गो. रा. खैरनार उपायुक्त असताना दाऊदच्या पाकमोडीया स्ट्रीटवरील बांधकामांवर हातोडा घातला असताना दाऊदने त्यांना धमकी दिली होती, असा दावा त्यांनी केला होता. आता दीर्घकाळ दाऊदचे वास्तव्य पाकिस्तानात असल्याचे बोलले जाते. अशावेळी महापालिकेतील किरकोळ वादात दाऊद कशाला लक्ष घालील व त्याचा हस्तक थेट महापौरांना धमक्या कशाला देईल, असे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे हा दाऊदचा तोतया हस्तक असल्याचे बोलले जात आहे.
<ठाणे महापालिका इतिहासात प्रथमच एखाद्या महिला महापौराला थेट दाऊद किंवा छोटा शकील या डॉनच्या नावांनी उचलून नेण्याच्या धमक्या आल्या आहेत. गँगस्टरांकडून महिलेला धमकी देण्याची वेळ यावी. इतका पुरुषार्थ खालावला आहे. ही शरमेची आणि खेदाचीही बाब आहे.
-मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे
एका महिलेला अशी धमकी येणे ही ठाण्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. अशा धमकी देणाºया प्रवृत्तींचा पोलीस शोध घेतील आणि योग्य ती कारवाई करतील.
-एकनाथ शिंदे,
पालकमंत्री, ठाणे जिल्हा
महापौर मीनाक्षी शिंदे यांना मंगळवारी रात्री दाऊदच्या नावाने धमकीचा फोन आला. खूप भांडणे करता, तुम्हाला उचलून नेऊ, अशी त्यांना धमकी देण्यात आली. ही धमकी देणाºयाचा शोध घेण्यात येत आहे.
-अनिल देशमुख,
वपोनि कापूरबावडी पोलीस ठाणे


ठाण्याच्या प्रथम नागरिकांना धमकी येणे ही चुकीची बाब आहे. ठाणे महापालिकेच्या महासभेत नगरसेवकही दहशतीखाली असतात. अनेक लोकहिताचे निर्णय होताना त्यावेळी प्रशासन गैरहजर असते. हे सर्व गंभीर प्रकार असून त्याची चौकशी व्हावी.
रवींद्रनाथ आंग्रे, काँग्रेस नेते, ठाणे

Web Title: Mayor threatens Dawood's handiwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.