महाविद्यालयातील तरुण कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी महापौरांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 08:41 AM2019-10-20T08:41:32+5:302019-10-20T08:46:35+5:30
भाजपा उमेदवाराचा भाऊ तथा महापौरांचा पती विनोद मेहतासह त्याच्या तीन साथीदारांवर भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मीरा रोड - एका परिचित अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराची पत्रके वाटणाऱ्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थी व एका तरुणास बळजबरी गाडीत घालून मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपा उमेदवाराचा भाऊ तथा महापौरांचा पती विनोद मेहतासह त्याच्या तीन साथीदारांवर भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आदी अदखलपात्र गुन्हा सांगत रात्रीपर्यंत टाळटाळ चालवल्याने पोलिसांच्या भूमिकेवरून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्यावर दाखल २१ गुन्हे - दावे यांची जाहीर केलेली माहिती येथील अपक्ष उमेदवाराने आपल्या प्रचार पत्रकात छापून वाटली होती. शनिवारी ५ वा. प्रचार संपणार म्हणुन काही शिल्लक पत्रके भाईंदर पूर्वेच्या साईनगर भागात ती वाटण्याचे काम त्यांचे परिचीत महाविद्यालयातील विद्यार्थी मित किशोरभाई पटेल (१९), यश प्रवीण पटेल (१९), महेश हेमंत बांदिया (१९) व शुभम किरण साळसकर (२३) हे चौघे जण करत होते.
पत्रके वाटत असल्याची माहिती मिळताच चारच्या सुमारास नरेंद्र मेहता यांचा लहान भाऊ तथा महापौर डिंपल मेहता यांचा पती विनोद मेहता हा आपल्या दोन खासगी अंगरक्षकांसह गाडी घेऊन आला. तेथे त्याने व त्याच्या अंगरक्षकांनी अर्वाच्च शिवीगाळ करत या तरुणांना मारत बळजबरी आपल्या गाडीत ढकलून गाडीत डांबले व गाडी सुरू करून मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ व धमक्या दिल्या.
याची माहिती अपक्ष उमेदवारासह काही सामाजिक कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी नाळाराम पाटील मार्ग परिसरात शोधाशोध चालवली असता मेहताची गाडी दिसून आली. त्यानंतर मात्र मेहताने आपली गाडी थेट नवघर पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांना बोलावून तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तेथे त्या तरुणांनाच आरोपी सारखी वागणूक देत खडसवायला सुरुवात केली.
काही वेळातच तरुणांचे पालक, परिसरातील नागरिक पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी मेहता विरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. हा दखलपात्र नव्हे तर अदखलपात्र गुन्हा आहे. फिर्याद द्यायची नसेल तर निघून जा, आम्ही डायरी नोंद करू असा उर्मट आणि अरेरावीपणा पोलिसांनी चालवल्याने नागरिक संतप्त झाले. लोकांनी नरेंद्र मेहतांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.
वरिष्ठांपर्यंत तक्रारी आणि सोशल मीडियावर पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त होऊ लागला. अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक पोलीस ठाण्यात जमले. सामान्य घरातील मुलांना मारहाण करून दहशत माजवणाऱ्या मेहता आणि त्यांच्या गुंड टोळीचे पोलीस बटिक बनले असून, त्यांनी वर्दी गहाण ठेवल्याची बोचरी टीका सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सामंत, सरिता नाईक, कृष्णा गुप्ता, गोवर्धन देशमुख, रोहित सुवर्णा आदींनी केली. अखेर रात्री पोलिसांनी विनोद मेहतासह त्याचे दोन खासगी अंगरक्षक व वाहन चालक अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. मेहतावर आधीचे देखील गुन्हे दाखल असुन त्याला अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.