परिवहन सेवा सक्षम करण्याचे महापौरांचे आदेश

By Admin | Published: December 17, 2015 01:54 AM2015-12-17T01:54:23+5:302015-12-17T01:54:23+5:30

ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची देणी बाकी असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सध्या परिवहनच्या बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत.

Mayor's order enabling transport service | परिवहन सेवा सक्षम करण्याचे महापौरांचे आदेश

परिवहन सेवा सक्षम करण्याचे महापौरांचे आदेश

googlenewsNext

ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची देणी बाकी असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सध्या परिवहनच्या बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांचेही हाल होत आहेत. या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, त्याची दखल घेऊन महापौरांनी बुधवारी परिवहनच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन ही व्यवस्था सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत.
परिवहनच्या ताफ्यात ३१३ बस असतानादेखील प्रत्यक्षात १९० च्या आसपासच बस रस्त्यावर धावत आहेत. थकीत वेतनासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी येत्या २६ जानेवारीला उपोषणाची हाक दिली आहे. या बैठकीत महापौर संजय मोरे यांनी परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी बेस्ट परिवहन सेवेकडून किंवा राज्य परिवहन मंडळाकडून प्रतिनियुक्तीवर व्यवस्थापकासह वाहतूक सल्लागार नियुक्त करणे, यासाठी बैठक आयोजित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सर्वच शहरांतील परिवहन सेवांमध्ये ईटीआयएम मशीन वापरल्या जात आहेत. मात्र, ठाणे परिवहन सेवेत आजही मानवी पद्धतीने तिकीट सेवा सुरू आहे. त्यामुळे एसआरटीयूच्या दरकरारानुसार मायक्र ोफॅक्स या कंपनीच्या ईटीआयएम मशिन्सच्या माध्यमातून तिकीट सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जानेवारी महिन्यात होणाऱ्या महासभेत आणण्याचे आदेशही त्यांनी दिले. बसगाड्यांचे वेळापत्रक, चालक, वाहक हे कोणत्या मार्गावरच्या बसमध्ये काम करीत आहेत, याची माहिती मिळण्यासाठी अद्ययावत संगणकप्रणाली विकसित करण्यासंबंधीही बैठकीत चर्चा करण्यात आली.

बेस्टमध्ये विलीन करा : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात बसची संख्या अपुरी असल्यामुळे अतिरिक्त फेऱ्या वाढविणे शक्य नसल्याचे पत्र महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांना परिवहन प्रशासनाने पाठविले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी परिवहन प्रशासनाला पुन्हा एक पत्र पाठविले असून त्यामध्ये परिवहन सेवेचे बेस्टमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे. ठाणे शहरातील विविध मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यासाठी परिवहन सक्षम नसेल तर परिवहन सेवेचे बेस्टमध्ये विलीनीकरण करा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Mayor's order enabling transport service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.