महापौरपदावरून भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 03:53 AM2018-07-08T03:53:51+5:302018-07-08T03:54:03+5:30
महापालिका सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी यांनी शुक्रवारी महापौर मीना आयलानी तसेच जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांना कोणतीही कल्पना न देता पत्रकार परिषद घेऊन मीना आयलानी जुलैअखेर महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
उल्हासनगर - महापालिका सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी यांनी शुक्रवारी महापौर मीना आयलानी तसेच जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांना कोणतीही कल्पना न देता पत्रकार परिषद घेऊन मीना आयलानी जुलैअखेर महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. तसेच ओमी टीमच्या पंचम कलानी भावी महापौर असून मुख्यमंत्री व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार पत्रकार परिषद घेतल्याचे पुरस्वानी म्हणाले. या प्रकाराने शहर भाजपातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने ओमी टीमसोबत महाआघाडी केली. मात्र, सत्ता स्थापनेसाठी काही नगरसेवक कमी पडत असल्याने त्यांनी साई पक्षासोबत हातमिळवणी केली. आयलानी यांच्या महापौरपदाला ५ जुलैला सव्वा वर्ष पूर्ण झाले. याचा फायदा घेत ओमी टीमने महापौरपदाची भाजपा वरिष्ठांकडे मागणी केली.
महापौरपदावरून आयलानी व कलानी आमनेसामने आल्याने भाजपातील निष्ठावंत गटाने थेट नागपूर गाठले.
राजीनाम्यास नकार
जमनुुदास पुरस्वानी यांनी कोणतीही कल्पना न देता पत्रकार परिषद घेतली, असे महापौर मीना आयलानी यांनी सांगितले.
वरिष्ठ नेते वा मुख्यमंत्री यांचा आदेश नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. याचा पुनरुच्चार महापौरांनी केला.