महापौरांचेही शिक्कामोर्तब : एप्रिलमध्येच होणार ठाकुर्ली उड्डाणपूलाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:10 PM2018-03-14T14:10:27+5:302018-03-14T14:10:27+5:30
मध्य रेल्वेच्या उपनगरिय वाहतूकीला अडथळा ठरलेल्या ठाकुर्ली रेल्वे फाटकाची समस्या आणखी अवघा महिनाभर भेडसावणार असून त्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा एप्रिलमध्ये करण्यात येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आदींनी त्या पुलाच्या कामाचा बुधवारी पाहणी दौरा केला.
डोंबिवली: मध्य रेल्वेच्या उपनगरिय वाहतूकीला अडथळा ठरलेल्या ठाकुर्ली रेल्वे फाटकाची समस्या आणखी अवघा महिनाभर भेडसावणार असून त्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा एप्रिलमध्ये करण्यात येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आदींनी त्या पुलाच्या कामाचा बुधवारी पाहणी दौरा केला.
त्या पाहणी दौ-यात पुलाच्या कामाबद्दल महापौर देवळेकरांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, दिलेल्या वेळेत पूर्ण होणारा हा महत्वाचा पूल आहे. काम अंतिम टप्प्यात असून मध्य रेल्वे प्रशासनाने केलेले सहकार्य देखिल तेवढेच मोलाचे आहे. पश्चिमेला गणेशनरकडे जाणारा आणि महात्मा गांधी रोडला जोडल्या जाणा-या रस्त्यांचे काम, डागडुजी तातडीने करण्यात यावी यासंदर्भात देवळेकर यांनी रेल्वेचे अभियंता कैलास पाटील यांच्याशी चर्चा केली. पूलावर पथदिवे लावणे, रस्त्यांचे काम, रंगरंगोटी यासह अन्य काम तातडीने व्हावीत आणि एप्रिलमध्ये त्याचे लोकार्पण व्हावे असा पत्रव्यवहार रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात देवळेकर स्वत: केडीएमसीचे आयुक्त पी.वेलरासू यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकल्पाच्या कामासंदर्भात महापालिकेचे अभियंता शैलेश मळेकर, भालचंद्र नेमाडे यांनी देवळेकर, मोरे यांना माहिती दिली. नुकताच महत्वाचा स्लॅब टाकण्यात आला असून साधारणपणे २१ ते २८ दिवसांच्या क्यूरींग कालावधीनंतर त्यावर डांबरीकरणाचे काम वेगाने करण्यात येणार असल्याचे मळेकर म्हणाले. तो पर्यंत पूलावरील वळण, पथदिवे, अन्य मजबुतीसंदर्भातील कामे करण्यात येणार असून एप्रिल पंधरवडयापर्यंत बहुतांशी काम पूर्ण होऊन त्यानंतरच्या कालावधीत लोकार्पण करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकावेळी दोन चार चाकी गाड्या विरुद्ध दिशांनी जाऊ शकतील असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच पुलावर वळण घेतांना कोणतीही अडचण होणार नसल्याचे ते म्हणाले. दुचाकींसह चारचाकी गाड्या या ठिकाणाहून गेल्यास सध्याच्या डोंबिवली येथिल उड्डाणपूलावर पडणारा ताण कमी होईल. त्यामुळे हा प्रकल्प झपाट्याने पूर्ण करावाच लागेल असे मोरे म्हणाले. त्यासोबतच रस्त्यांची कामे तातडीने करा, पूर्वेसह पश्चिमेला रेल्वे हद्दीतील रस्त्यांची डागडुजी तात्काळ व्हावी. अन्यथा वाहतूकीला अडथळा होणार असल्याचे मोरे म्हणाले. ‘लोकमत’ने सातत्याने या पुलाच्या कामाचा पाठपुरावा करत वृत्तांकन करण्यात सरशी मारल्याचे सांगत महापौर देवळेकरांनी कौतुक केले. त्या पाठपुराव्यासह अभियंत्यांच्या सकारात्मक पावित्र्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले.
* प्रकल्प पाहणी दौ-यानंतर महापौर देवळेकर, मोरे, थरवळ आदींनी गणेश मंदिरमार्गे पादचारी पुलावरुन येत स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांच्या कार्यालयात विसावा घेतला. तेथे त्यांनी आगामी काळातील महापालिकेच्या महत्वकांक्षी प्रकल्पासंदर्भात रेल्वे अधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर मात्र मोरेंसह महापौर - दामले यांच्यामध्ये ‘गुप्तगु’ चर्चा झाली. त्यावेळी मात्र कोणीही तेथे नव्हते. त्यामुळे महापालिकेत सध्या कार्यरत असलेल्या ३आर या त्रिसुत्रीमध्ये नेमकी काय चर्चा असेल याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. दामले यांचे शिवसेनेशी असलेली सलगी सर्वश्रुत असून महापालिकेच्या अर्थसंकल्पासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* दरम्यान, दामले यांनी उड्डाणपुल प्रकल्प पूर्णत्वास जाईल, पण त्याआधी ठाकुर्लीमधील महिला समितीनजीकच्या एका रस्त्याचा वाहतूकीसाठी वापर करण्यात यावा, जेणेकरुन मारुती मंदिरानजीकची कोंडी काही प्रमाणात कमी होईल. तो रस्ता रेल्वे हद्दीत असून त्यासाठी रेल्वेने सहकार्य करावे, महापालिकेने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी महापौर देवळेकरांना केले. त्यासंदर्भात माहिती घेऊन नगररचना विभाग, आयुक्तांसमवेत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.