महासभा वेळेत सुरू करण्याचा संकल्प, महापौरांचे सूतोवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 05:19 AM2019-12-03T05:19:58+5:302019-12-03T05:20:11+5:30
ठाणे महापालिकेच्या इतिहासात महासभा कधीच वेळेत सुरूझालेली नाही.
ठाणे : ठाणे महापालिकेची महासभा यापुढे माझ्या कारकिर्दीत वेळेतच सुरूहोईल, असा दावा नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के यांनी केला. या पूर्वीच्या तत्कालीन महापौरांनीदेखील अशाच पद्धतीने नव्या नवरीचे नऊ दिवस करून महासभा वेळेत सुरूकरण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते कालातंराने बासनात गुंडाळले गेले. आता म्हस्के आपल्या दाव्यावर कितपत ठाम राहतात, महासभा वेळेत सुरूकरणार का, अशा अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे महासभेला असलेल्या शिपायांसाठी विशेष बॅजही तयार करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या इतिहासात महासभा कधीच वेळेत सुरूझालेली नाही. हा कित्ता तत्कालीन महापौर मीनाक्षी शिंदे यांनीसुद्धा गिरवल्याचे दिसून आले. २०१७ मध्ये महापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या कार्यकाळात महासभा कोणत्याही परिस्थितीत उशिराने सुरूहोऊ देणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले होते. तसेच, महासभेला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले होते. सुरुवातीला दोन ते तीन महासभांना त्यांनी आपली आश्वासने पाळल्याचे दिसून आले. परंतु, त्यानंतर कधीच वेळेत कोणतीही महासभा सुरू झालेली नाही.
मागील काही महिने तर ११.३० ची महासभा दुपारी २ ते ३ वाजतादेखील सुरू झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच एक महासभा दोन ते तीन दिवस चालत होती.
आजच्या सभेकडे लक्ष
आता पुन्हा नवनिर्वाचित महापौर म्हस्के यांनी आपला कार्यकाळ गाजविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार मेट्रोबाबत त्यांनी घेतलेली भूमिका, घाणेकरच्या वारंवार बंद पडत असलेल्या लिफ्टबाबत दाखविलेली सजगता यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. आता तर महासभा वेळेतच सुरू करण्यात येईल, असे फर्मान त्यांनी काढले आहे. आता मंगळवारी म्हणजेच महासभा असून तिची वेळ ही दुपारी १२ वाजताची आहे, त्यानुसार, त्यांनी प्रत्येक अधिकाºयाला फोन करायला सांगितले असून नगरसेवकांनीदेखील वेळेत हजर राहण्याच्या सूचना फोनद्वारे दिल्या आहेत.
या निर्णयाच्या शुभेच्छा महासभा वेळेत सुरूझाल्यावरच त्यांना देऊ, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. महासभेत विविध विभागांचे शिपाई हजर असतात. त्यांनादेखील आता लगाम घालण्यासाठी महासभेचे कामकाज पाहणाºया शिपायांना बॅज असावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यासही त्यांनी सांगितले.