महापौरपदाचा विजय जळगावात, जल्लोष ठाण्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 03:42 AM2021-03-19T03:42:57+5:302021-03-19T06:41:28+5:30
राज्यात एकत्र आल्यापासून प्रत्येक महापालिका काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने पावले उचलली आहेत. त्यानुसार भाजपला पहिला फटका राष्ट्रवादीने सांगलीत दिल्यानंतर गुरुवारी शिवसेनेने जळगाव महापालिकेत मोठा शॉक दिला.
ठाणे: गेल्या काही दिवसांपासून जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीवरून मोठे राजकारण सुरू आहे. गुरुवारी झालेल्या या महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून, जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. विजय जरी जळगावमध्ये झाला असला तरी त्याचा जल्लोष मात्र ठाण्यातील घोडबंदर रोडवर झाला. जळगाव महापालिकेतील भाजपच्या २७ फुटीर नगरसेवकांसह एमआयएमचे ३ आणि शिवसेनेचे १५ नगरसेवक ठाण्यातील एका हॉटेलात ठाण मांडून होते. त्याचाच फटका भाजपला बसल्याचे दिसले.
राज्यात एकत्र आल्यापासून प्रत्येक महापालिका काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने पावले उचलली आहेत. त्यानुसार भाजपला पहिला फटका राष्ट्रवादीने सांगलीत दिल्यानंतर गुरुवारी शिवसेनेने जळगाव महापालिकेत मोठा शॉक दिला. स्पष्ट बहुमत असतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांना ४५ तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना ३० मते मिळाली. महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेने एक आठवड्यापूर्वी भाजपसह एमआयएमचे मिळून ३० नगरसेवक आणि पक्षाच्या १५ नगरसेवकांचा मुक्काम ठाण्यातील घोडबंदर भागातील आलिशान असलेल्या बाइक प्लाझा हॉटेलमध्ये ठेवला होता. त्यांना काय हवे काय नको यासाठी ठाण्यातील शिवसैनिक दिवसरात्र राबताना दिसत होते. खाण्यापिण्याबरोबर मद्याचीही सोय या सर्वांना केल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार याच हॉटेलमध्ये राहून या नगरसेवकांनी वेबिनार महासभेच्या माध्यमातून लॅपटॉपद्वारे मतदान केल्याची माहितीही सूत्रांनी दिली. भाजपचे नगरसेवक फोडल्याने आपल्या पक्षातील नगरसेवकदेखील फुटू शकतात, अशी भीती शिवसेनेलाही होती. त्यामुळे त्यांनी आपले १५ नगरसेवकदेखील ठाणे मुक्कामी आणले होते. आता निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर या सर्व नगरसेवकांना बसने जळगावला रवाना केले आहे.
ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार विनायक राऊत आणि भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांनी तर नगरविकास मंत्री या नात्याने भाजपने पक्षादेश झुगारल्याने तुमचे सदस्यत्व बाद करण्याची मागणी केली तरी कायद्यातील पळवाटा शोधून अभय देण्याची ग्वाही या २७ नगरसेवकांना दिल्याची चर्चा आहे.